मुलांना विचार, भावना व्यक्त करू द्या!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - ""लहान मुलांमधील उत्सुकता दाबू नका, त्यांच्या विचारांना, शब्दांना, भावनांना व्यक्त होऊ द्या. त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी, चित्रे, गाणी, बडबडगीते तयार करायला प्रोत्साहन द्या. सर्वच मुलांना उच्च दर्जाची सौंदर्यदृष्टी असेलच असे नाही; परंतु चित्रकला, संगीत, नृत्य यांसारखी पूरक कौशल्ये शिकवली, तर त्यांच्यातील "स्मार्टनेस' नक्कीच विकसित होईल,'' असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी व्यक्त केले.

"सकाळ' प्रकाशन आणि शुभम साहित्यतर्फे आयोजित "मुलांच्या वाढीनुसार बदलणारे पालकत्व' या विषयावरील परिसंवादात डॉ. गोडबोले बोलत होते. या वेळी बाल आहारतज्ज्ञ डॉ. अश्‍विनी गोडबोले, बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. श्रृती पानसे, "सकाळ प्रकाशन'च्या संपादक दीपाली चौधरी, कुणाल ओंबासे उपस्थित होते.

डॉ. गोडबोले म्हणाले, ""आपले मूल स्मार्ट असावे, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. मुले एखादी कृती कलात्मक पद्धतीने करीत असतील, अभ्यास वेगळ्या शैलीने करीत असतील, तर ही एक सौंदर्यदृष्टीच आहे, हे पालकांनी ओळखावे. मूल स्मार्ट बनण्याची सुरवात करण्यासाठी यांसारख्या गोष्टी पुरेशा आहेत.''

डॉ. पानसे म्हणाल्या, ""माणसाच्या बाह्यवर्तनावरून त्याच्या अंतरंगात काय चालले आहे, याचा अंदाज मानसशास्त्रातून घेण्यात येतो. त्यातील समान पद्धती शोधून निष्कर्ष काढले जातात. त्यावरूनच माणसाच्या अंतरंगातील शास्त्रीय आणि सत्याकडे जाणारी माहिती आता मिळू लागली आहे.''

डॉ. अश्‍विनी गोडबोले म्हणाल्या, ""मुलांच्या उपजत गुणांचा शोध घेण्याचा प्रवास म्हणजेच स्मार्ट पालकत्व. मुलांचे अगदी छोटेसे यशसुद्धा साजरे करणे आणि एखादे कौशल्य मुलांबरोबर आपणही मूल होऊन शिकणे म्हणजेच स्मार्ट पालकत्व.''
परिसंवादाच्या उत्तरार्धात उपस्थितांच्या प्रश्‍नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन चौधरी यांनी केले.

12 डिसेंबरपर्यंत पुस्तक प्रदर्शन
शुभम साहित्यतर्फे अत्रे सभागृहात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात "सकाळ' प्रकाशनाच्या विज्ञान, आरोग्य, कथा-कादबंरी, स्पर्धा परीक्षा, धार्मिक अशा विविध विषयांवरील जवळपास शंभरहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. येथे 12 डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ दरम्यान 25 टक्के सवलतीच्या दरात पुस्तके मिळणार आहेत.

Web Title: Give freedom to Chindren