
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे 15 ऑगस्ट पूर्वी न दिल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिला.
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे 15 ऑगस्ट पूर्वी न दिल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनी समोर आंदोलन करताना ते बोलत होते.
पिक विमा काढणाऱ्या खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे न दिल्यामुळे शिवसेने हा आंदोलन केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, ''राज्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपूर्वींचे पिक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाही. खासगी विमा कंपन्या केंद्र, राज्य व शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे. या कंपन्या पिक विम्याचे पैसे देताना शेतकऱ्यांशी खोड्या करीत आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट पूर्वी कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या सुचना दिल्या आहेत''
यावेळी इपको टोकिया कंपनीचे मुख्य व्यवस्थापक एस. संयुवंशी म्हणाले, ''राज्यातील तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्या काढण्याचे काम यावर्षी कंपनीला मिळाले आहे. शेतकऱ्यांनी सुमारे पंधराशे कोटी रूपयांचे क्लेम केले आहे. त्यापैकी पाचशे कोटी रूपये दिले आहे. 31 जुलै पर्यंत पीक कापणीचा अहवाल आल्यानंतर उर्वरित विमा रक्कम देण्यात येईल.''
येरवडा टपाल कार्यालयापासून आंदोलक मोर्चाने कॉमरझोन येथील विमा कंपनी पर्यंत गेले. आंदोलकांनी विमा कंपन्यांचे प्रातिनिधिक अंतयांत्रा काढली होती. पारंपारिक वाद्य वाजवत मोर्चा कंपनीच्या आवारात येताच आंदोलक कंपनीच्या आवारात शिरले. त्यामुळे पोलिसांनी सुध्दा बघ्याची भुमिका घेतली. कंपन्यांनी नेमकी विम्याची रकम व शेतकऱ्यांची संख्या सांगता येत नसल्याचे सांगताच सुरवातीला गोंधळ उडाला होता.
पिण्याच्या पाण्यास अल्पोहाराची व्यवस्था
जिल्ह्यातील आंदोलक सकाळ पासूनच येणार असल्यामुळे नगरसेवक संजय भोसले यांनी सर्व आंदोलकांना पिण्याची पाण्याची व अल्पोहाराची व्यवस्था केली होती. मोर्चाची सुरवात कडक उन्हात तर सांगता पावसामुळे झाल्यामुळे घामाघुम झालेले आंदोलकांना पावसात भिजण्याचा मोह आवरता आले नाही.