पुणे : पूरस्थितीमुळे बाधित झालेल्यांचा पुनर्वसन अहवाल द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमध्ये बाधित झालेल्या कुटुबांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तत्काळ अहवाल सादर करा.

- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमध्ये बाधित झालेल्या कुटुबांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तत्काळ अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (गुरुवार) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पुणे जिल्ह्यातील सन 2019 मधील अतिवृष्टी व पुरस्थितीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू  गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, उप-विभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.    

पूरपरिस्थितीमध्ये मृत झालेल्या आणि वाहून गेलेल्या पशुधनाचे मालक असलेल्या बाधित शेतकऱ्यांना दिलेली मदत, नुकसानग्रस्त छोटे व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांची संख्या व त्यांना मदत देण्याकरीता प्राप्त झालेल्या अनुदानाबाबत यावेळी माहिती घेण्यात आली.

घरांच्या नुकसानीबाबत, बाधित घरांसाठी घरभाडे मदत, पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी मदत देणे, पुरग्रस्तांना तात्काळ नवीन कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही, पूरग्रस्त भागांमध्ये घरांच्या दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी वाळू व मुरुम उपलब्ध करुन देण्याबाबत, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसानीसाठी मदत बाधितांची संख्या, मदत वाटपासाठी प्राप्त झालेल्या निधीबाबत, अतिवृष्टीमुळे व पुरामुळे  निराधार झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याबाबत, सानुग्रह अनुदान, निवारा छावणीमध्ये स्थलांतरित केलेल्या व्यक्तींची संख्या व त्यांना वाटप केलेले अनुदान याची सविस्तर माहिती घेण्यात आली.

तालुकानिहाय मयत व्यक्तींची संख्या व त्यांच्या कुटुंबियांना वाटप केलेल्या मदतीचा आढावाही या बैठकीमध्ये घेण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Report of Flood Affected Peoples of their Rehabilitation ordered by Pune Collector