वंचित शेतकऱ्यांना चार दिवसांत पाणी देणार : दत्तात्रेय भरणे

राजकुमार थोरात
गुरुवार, 17 मे 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये रेडणी, सराफवाडी, निरवांगी परिसरातील निरा डाव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना चार दिवसांमध्ये पाणी देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये रेडणी, सराफवाडी, निरवांगी परिसरातील निरा डाव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना चार दिवसांमध्ये पाणी देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन देवकर यांच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज गुरुवार (ता. १७) रोजी आमदार भरणे यांची पुण्यामध्ये भेट घेऊन निरा डाव्या कालव्याच्या ५७ क्रंमाकाच्या वितरिकेवरील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली होती. आमदार भरणे यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याशी संपर्क साधून कालव्याच्या पाण्याचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

यासंदर्भात भरणे यांनी सांगितले की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आम्ही पाण्याचे योग्य नियोजन केले होते. सर्व शेतकऱ्यांना वेळेमध्ये पाणी देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची होती. मात्र, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला आहे.

आमदार या नात्याने मी लक्ष घातले असून, वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. टेल टू हेड पद्धतीने पाण्याचे दुसरे आवर्तन सुरु होणार असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार असल्याचे  भरणे यांनी सांगितले.

Web Title: To give water to deprived farmers in four days says MLA Dattatreya Bharane