महिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सचिव किरण मोघे यांनी केले. येथे आयोजित राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

वाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सचिव किरण मोघे यांनी केले. येथे आयोजित राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात स्वयंसिद्धा प्रतिष्ठान आणि प्रतिभा महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाचे उद्‌घाटन उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांच्या हस्ते झाले. मनीषा पाटील, विदर्भ विभागप्रमुख लक्ष्मी शैला, मुंबई विभागप्रमुख वृषाली शिंदे, श्रुती गणपुले, पुरुषोत्तम सदाफुले, प्रदीप गांधलीकर, सुरेश कंक उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. मनीषा पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ओव्या सादर केल्या. यानंतर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अपर्णा मोहिले, माधुरी ओक, शोभा जोशी, सुरेखा कटारिया, तेजस्वी सेवेकरी, ज्योती कपिले, मनीषा सालीम, दीपाली वंदना, स्नेहा काटकर यांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मदन देगावकर यांनी मानपत्राचे वाचन केले. 

किरण मोघे म्हणाल्या, की महिलांना प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे. रोटी व्यवहाराबरोबरच बेटी व्यवहार झाले पाहिजेत. महिलांना सन्माननीय रोजगार मिळत नाही. आर्थिक सक्षमीकरणानंतरच महिला सक्षम होतील. कुटुंबापासून संपूर्ण समाजाची एकजूट झाल्याशिवाय महिलांना सन्मान मिळणार नाही.  संविधान आणि महिला या विषयावर चर्चासत्र झाले. त्यामध्ये मनीषा महाजन, दीपाली वंदना, पल्लवी चौधरी आणि लक्ष्मी शैला यांनी भाग घेतला. या वेळी महिलांच्या समस्या आणि कायदे या विषयावर चर्चा झाली.  वर्षा बालगोपाल, मानसी चिटणीस, सायली शेंडगे, प्राजक्ता रुद्रावार, समृद्धी सुर्वे, वृषाली वजरीनकार, सारिका माकोडे यांनी नियोजन केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी प्रास्ताविक केले. वसुंधरा शर्मा आणि दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर भंडारे यांनी आभार मानले.

Web Title: Give women the freedom to decide says Kiran Moghe