गर्ल ऑन ‘विंगचेअर’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली, वावर यावर मर्यादा आल्या; पण महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या कात्रजमधील दीक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून बोलावलं जातंय. व्हील चेअरशिवाय फिरता न येणारी दीक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी आणि तिचं सामाजिक काम यामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

‘शाश्‍वत विकास’, ‘तरुणांचे नेतृत्व’, ‘दिव्यांगांचे अधिकार’ या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, साऊथ कोरिया आणि इजिप्तमध्ये जाऊन आली आहे. दिव्यांगांना कोणत्या सोयी-सुविधा आवश्‍यक आहेत, त्यासाठी शहर नियोजन करताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर तिने मलेशियातील चर्चासत्रात सादरीकरण केले होते. साऊथ कोरियामध्ये झालेल्या कल्चरल एक्‍सेंज प्रोग्राममध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ती नोकरी, उच्च शिक्षण एकाच वेळी करताना मासिक पाळी व आरोग्यासंबंधी जनजागृती, विविध उपक्रम करते. 

पुण्यातील झेड ब्रीजखाली राहणाऱ्या रस्त्यावरील मुलांनाही तिने जवळपास दोन वर्ष शिकवले. यासोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखन सहाय्यक मिळवून देणे, अंध मुलांना अभ्यासात मदत व्हावी, यासाठी ऑडिओ बुक्‍स, रेकॉर्डिंग करणे ही कामं तर ती नेहमी करत असते. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, हेटाळणी, सरकारी उदासीनतेमुळे अपुऱ्या सोयी-सुविधा यामुळे अनेकदा मन निराश झालं, नकारात्मक वाटलं तरी आई-आजी आणि बहिणीने दिलेली खंबीर साथ या प्रवासात इथवर घेऊन आली, असं दीक्षा सांगते. 

अपंगत्वामुळे कॉलेजच्या सहलीला तिला प्रवेश नाकारला होता, तर मलेशियाला जाताना मुंबई एअरपोर्टवर तिला विमान प्रवास करण्यास एअरपोर्ट प्रशासनाने विरोध केला होता. अशा प्रसंगांचा पदोपदी सामना करत ती आज जगभर एकटी फिरते. नुकतंच ती अहमदाबाद सहलीला एकटी जाऊन आली. ‘गर्ल ऑन व्हीलचेअर’ ऐवजी ती स्वत:ला ‘गर्ल ऑन विंगचेअर’ म्हणते. कारण तिच्या चेअरची दोन फिरती चाकं ही तिच्यासाठी फिनिक्‍सचे पंख आहेत.

अपंगत्वाकडे सकारात्मकतेने पाहण्याची मानसिकता भारतीयांमध्ये नाही. भारतात व्हील चेअर्ससाठी साधे रॅम्प नाहीत. कोणत्याही सुविधा नाहीत. आमची चूक नसताना आम्ही हे सारे का सहन करायचे? 
- दीक्षा दिंडे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global handicapped day special Girl on Wingchair Diksha Dinde