शाळेचे नाव बदलल्याने गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

शाळेतील घडामोडींबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली. त्यांचा आम्ही आदर करतो. २०११ पासून आम्ही फ्रॅंचाइजी घेऊन स्वतंत्ररीत्या शाळा चालवली आहे. बोर्डाची संग्लनता, अभ्यासक्रम, नेतृत्व आणि धोरणात काही बदल होणार नाहीत. शैक्षणिक गुणवत्तेवर बक्षीसपात्र शाळा करू. संबंधितांना विश्‍वासात घेऊनच पुढे मार्गक्रमण करू.
- अमरिता व्होरा, मुख्याध्यापिका, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड 

पिंपरी - चिंचवड- लिंक रोड येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे नाव बदलून एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल करण्यात येत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापकाने पालकांना मेलद्वारे कळविले आहे. मात्र, शाळेचे नाव आणि दर्जा बदलल्यामुळे पालकांनी सोमवारी (ता. २२) गोंधळ घातला. शाळेने आमची आर्थिक फसवणूक केल्याची व्यथा पालकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. दरम्यान, पालकांचा रोष बघून पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड शहरात नावाजलेल्या शाळांपैकी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल हे एक आहे. ‘ग्लोबल फाउंडेशन’ या नावामुळे शाळेचे शुल्कदेखील सर्वाधिक महागडे आहे. जगात या शाळेच्या १२ शाखा आहेत. त्यापैकी एक एल्प्रो कंपनीच्या हिंद चॅरिटेबल ट्रस्टने ग्लोबल फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करून त्यांची फ्रॅंचाइजी घेतली. मात्र, काही कारणास्तव अनेक वर्षांचा हा करार ग्लोबलने संपुष्टात आणला आहे. करार तहकूब झाल्यामुळे शाळेच्या नावात बदल करण्यात येणार आहे. याविषयी शाळा व्यवस्थापनाने पालकांना ई-मेलद्वारे माहिती कळवली होती. परंतु, शाळा व्यवस्थापनाने ग्लोबलच्या नावाखाली पालकांकडून भरमसाट शुल्क उकळले आहे. आता ग्लोबलऐवजी ‘एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल’ (इआयएस) असे करण्यात आले आहे. तसेच, शाळेचा गणवेश व ओळखपत्रावर देखील ‘एल्प्रो’ हेच नाव वापरण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. या शाळेत सध्या पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला.

अशा परिस्थितीत पालकांनी काय करावे, असा प्रश्‍न आंदोलनकर्ते पालकांनी विचारला आहे. याबाबत अनेक पालकांनी शाळेविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याची भूमिका मांडली. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका अमरिता व्होरा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global International School Elpro International School Parents Confusion