पुलंनी गुणवत्तेचे भान शिकविले - फडणीस

pulotsav  Ceremony in pune
pulotsav Ceremony in pune

पुणे - नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये काम करत असताना आपण भरकटत जाणार नाही ना, याचे भान ठेवणे आवश्‍यक आहे. गुणवत्तेचे भान कसे असावे, हे पुलंनी दाखवून दिले. सर्वांनीच गुणवत्तेचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले. 

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त पु. ल. परिवाराच्या सहयोगाने, ‘आशय सांस्कृतिक’ व ‘स्क्वेअर-१’ आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध अभिनेते, लेखक चिन्मय मांडलेकर यांना फडणीस यांच्या हस्ते ‘पुलं तरुणाई सन्मान’ प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर एनकेजीएसबी बॅंकेचे असिस्टंट जनरल संदीप पत्की, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक हर्षल जोडगे, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर-१चे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य आदी उपस्थित होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

फडणीस म्हणाले, ‘‘माइक, मद्य आणि मालिका समोर आल्यावर भरकटत कसे जातो, याचे भान राहत नाही. ते जाऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. पुलंनी नेहमीच सर्व प्रकारच्या साहित्याला समान महत्त्व दिले. ललित कलांचे पुलंना विशेष भान होते. अनेक साहित्यिकांचे लेखन मी सचित्र केले; परंतु पुलंचे साहित्य सचित्र करण्याचा आनंद खूप वेगळा होता. पुलं म्हणत असत, की कोणतेही नाटक लिहिण्यापूर्वी ते मला रंगमंचावर दिसते आणि मग मी त्याचे लेखन करतो. त्यांच्या या शैलीचा अनुभव मला अनेकदा आला आहे. आसू आणि हसू या दोन्हींच्या कंसात नाट्यसंहिता सामावलेली असते. प्रायोगिक आणि व्यावसायिक असे दोन पंथ नाट्य व्यवसायात आहेत. यापैकी प्रायोगिक रंगभूमीवरील लोक बिनधास्त असतात, तर व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना त्यांची व्यावसायिक गणिते सांभाळावी लागतात.’’ 

मांडलेकर म्हणाले, ‘‘पुलं वाचण्याचेदेखील एक वय असते, असे विधान करणाऱ्यांना पुलं कळलेच नाहीत. पुलं आमच्या गुणसूत्रात आहेत. आणीबाणीच्या आणि त्यानंतरच्या काळात पुलंनी केलेले लेखन आजच्या काळालाही लागू होते. आजच्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही.’’ 

लेखनासाठी कान उघडे हवेत 
दिग्पाल लांजेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मांडलेकर यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) प्रशिक्षणाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘प्रशिक्षण आणि वस्तुस्थिती यामध्ये खूप फरक असतो. सुदैवाने मी मुंबईतून दिल्लीला गेलो असल्याने याची मला जाणीव होती. चांगले लेखन करण्यासाठी तुमचे कान सदैव उघडे असावेत.’’

यानंतर भा.डि.पा.चे वल्ली हा कलाविष्कार सावनी वझे, मंदार भिडे, चेतन मुळे, ओंकार रेगे, पुष्कर बेंद्रे, सारंग साठ्ये या कलाकारांनी सादर केला. 

नाटकाचे गणित 
सत्काराला उत्तर देताना मांडलेकर यांनी फडणीस यांच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांचा उल्लेख केला. तो धागा पकडत फडणीस म्हणाले, ‘‘त्यांचे गणित कसे आहे, हे मला माहीत नाही; परंतु रंगभूमीचे ‘गणित’ त्यांना चांगल्या पद्धतीने जमावे, ही अपेक्षा आहे.’’ यावर सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com