शहरात पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला

Sparrow
Sparrow

पिंपरी - ‘चिऊ चिऊ ये, दाणा खा, पाणी पी, भुर्र उडून जाऽऽ’ असे बडबडगीत बालपणी सर्वांनीच ऐकले असेल. आजी किंवा आईजवळ बसून एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताच्या बोटाने दाणा-पाणी खाऊ-पिऊ घालण्याची कृती केली असेल. परंतु, शहरीकरण व अन्य कारणांनी चिवचीव करणारी चिऊताई दृष्टीआड झाली. या चिमण्यांची संख्या वाढावी व जैवसाखळीचा समतोल राखावा, यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी, पक्षिप्रेमी व सुजाण नागरिक दोन-तीन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश दिसू लागले असून, चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकू येऊ लागला आहे.

याबाबत ज्येष्ठ पक्षिनिरीक्षक अभिजित पवार म्हणाले, ‘‘पूर्वी शहरात कौलारू घरे, झाडे, शेती होती. त्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी मुबलक जागा होती. परंतु, शहरीकरणामुळे काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आणि चिमण्यांची संख्या घटू लागली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नागरिकांत जागृती होत आहे. कृत्रिम घरटी बांधली जात आहेत. अन्न-पाण्याची सोय केली जात आहे.’’

‘नेचर फॉर अर्थ’ संस्थेचे पक्षिअभ्यासक श्रेयस पट्टणशेट्टी म्हणाले, ‘‘कृत्रिम घरट्यांमुळे चिमण्यांची संख्या वाढली आहे. चिमण्यांसाठी टाकलेले धान्य कबुतर, कावळे खात असल्याने घरट्यांमध्येच चिमण्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करायला हवी.’’

वाढते तापमान, प्रदूषित नाले-नद्यांमुळे चिऊताईबरोबर अनेक पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाण्याची भांडी ठेवायला हवीत. एका छोट्या कृतीमुळे अनेक पक्ष्यांचा जीव वाचेल आणि निसर्गसंवर्धनाला हातभार लागेल.
- उमेश वाघेला, पक्षिअभ्यासक व अध्यक्ष, अलाइव्ह संस्था

पक्षिप्रेमींचे प्रयत्न
संत तुकारामनगर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा व माजी महापौर योगेश बहल यांनी बी. डी. किल्लेदार, पु. ल. देशपांडे व राजेश बहल या उद्यानांसह संत तुकारामनगर, महेशनगर, वल्लभनगर भुयारी मार्ग आदी परिसरात ३२२ लाकडी घरटी बसवली आहेत. पाण्याची व्यवस्था केली आहे. पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड सोसायटीने विविध ठिकाणी सुमारे ४०० कृत्रिम घरटी बांधली आहेत. पाण्याची व खाद्याची व्यवस्था केली आहे.

सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर म्हणाले, ‘‘टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून चार वर्षांपूर्वी सोसायटीच्या आवारात कृत्रिम घरटी बांधली. नाशिक येथील नेचर फॉर एव्हर संस्थेशी ई-मेलद्वारे संपर्क साधून अधिक माहिती घेतली. चारशेपेक्षा अधिक कृत्रिम घरटी बांधली असून, घरट्यात चिमण्या दिसू लागल्या आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com