सिंहगडावर जा, ‘रोप-वे’ने

सिंहगडावर जा, ‘रोप-वे’ने

पुणे - मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंहगडावरील रोप-वेचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पाच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून, रायगडानंतर राज्यातील हा दुसरा रोप-वे असणार आहे.

सिंहगडावर रोप-वे उभारण्याच्या प्रस्तावावर २००४ पासून कार्यवाही सुरू आहे. या प्रस्तावाला २०११ मध्ये प्राथमिक मान्यता देण्यात आली होती. ही मान्यता देताना त्यामध्ये काही बदल सुचविण्यात आले होते. ते बदल केल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. केंद्र सरकारकडून काही काळापूर्वी त्यास मान्यता दिली. सिंहगडावर रोप-वेचे दुसरे टोक होणार आहे, यास वन विभागाने मान्यता दिली आहे. 

एका खासगी कंपनीकडून हा रोप-वे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पाच हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी येथून हा रोप-वे असणार आहे, तर सिंहगडावरील पुणे दरवाजाच्या वरील बाजूस त्याचे दुसरे टोक असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रोप-वेसाठी कशा प्रकारे बांधकाम असावे, यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांनी मान्यता दिल्यानंतर रोप-वेसाठीच्या बांधकामाचे नकाशे ‘पीएमआरडीए’कडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले. ‘पीएमआरडीए’कडून नुकतीच रोप-वेच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 

सिंहगड महोत्सवाचे आयोजन
रोप-वेच्या भूमिपूजनावेळी ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व वाढावे, यासाठी ‘पीएमआरडीए’च्या सहकार्याने ‘सिंहगड महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे, असे शिवाई रोप- वे फाउंडेशनचे प्रमुख उदयराज शिंदे सरकार यांनी सांगितले. पर्यटन वाढीस लागावे, स्थानिकांना रोजगार मिळावा, येथील कला, संस्कृती, क्रीडा, सांस्कृतिक, विविध स्पर्धा आणि खाद्य प्रकाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून हा ‘सिंहगड महोत्सव’ होणार आहे. येथे इमारत बांधताना मराठी बाणा जपला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.  

तिकीट राहणार २५० ते ३००
खडकवासला - सिंहगडावर होणाऱ्या रोप- वेच्या कामातील सर्व अडथळे दूर झाल्याने जानेवारीअखेर या कामाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. रोप- वेच्या पायथ्याच्या स्टेशनशेजारी इमारत बांधली जाणार आहे. रोप-वेसाठी सुमारे २५० ते ३०० रुपये तिकीट असणार आहे. 

रोप- वे खासगी असला तरी प्रकल्पासाठी झालेला खर्च, देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्च गृहीत धरून सरकारकडून याचा तिकीटदर ठरविला जाणार आहे. पायथ्याला स्टेशनमध्ये शिवप्रेमी, पर्यटकांसाठी इमारत उभारली जाणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील माहितीपट, चित्रपट, ऐतिहासिक वास्तू, वस्तूंची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. 

रोप- वेचे पायथ्याचे स्टेशन हे आतकरवाडी येथे आहे. येथे असलेली ही घरे वन विभागाच्या हद्दीत आहेत. या वाडीला गावठाणाचा दर्जा नाही. ग्रामस्थांनी गावठाणाचा दर्जा मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. येथील वन विभागाचे नाव कमी करून येथे गावठाण दर्जा दिल्यास स्थानिक ग्रामस्थांना व्यावसायिक बांधकामे करता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com