साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधूची घोड्यावरून मिरवणूक
स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
उरुळी कांचन : स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
वळती येथील शिवाजी विठ्ठल कुंजीर यांची मुलगी पूजाचा बोरी भडक (ता. दौंड) येथील शांताराम पांडुरंग कारखिले यांचा मुलगा सोमनाथ याच्यासोबत नुकताच उरुळी कांचन (ता.हवेली) येथील कस्तुरी मंगल कार्यालय येथे अतिशय साध्या व शिवशाही पद्धतीने विवाह झाला. दरम्यान, साखरपुड्याला जाण्यापूर्वी वळती येथे पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात नववधू पुजाची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना फेटे घालण्यात आले होते व माहेरचे झाड या उपक्रमाअंतर्गत नववधूच्या नावाने एक झाड लावण्यात आले. तसेच विवाहावेळी मंगल अष्टकांपूर्वी नवरदेव व नववधूने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाजी महाराजांची आरती केली.
तसेच लग्नातील पत्रिका छपाई व वाटपाचा अवास्तव खर्च टाळून केवळ सोशल मीडिया व तोंडी निरोप देऊन पाहुण्यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. तसेच लग्नाच्यावेळी आलेल्या नेतेमंडळींच्या सत्काराच्या कार्यक्रमाला देखील फाटा देण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी सरपंच कुसुम कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कुंजीर, काका कुंजीर, बाळासाहेब सूर्यवंशी, पांडुरंग कुंजीर, बापूसाहेब कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, संतोष कुंजीर, शिवराम कुंजीर यांच्यासह ग्रामस्थ व तरुणांनी मेहनत घेतली.
विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद, 'यशवंत'चे माजी अध्यक्ष के. डी. कांचन, सुभाष कांचन, प्रकाश जगताप, राजाराम कांचन, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन उपस्थित होत्या.