सफाई कामगाराला सापडले दागिने आणि त्याने... 

विलास काटे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मंगल कार्यालयात सापडलेले सोन्याच्या 15 तोळ्यांच्या दागिन्यांचे पाकीट सफाई कामगाराने प्रामाणिकपणे परत केले. सागर एकनाथ किदरे असे या प्रामाणिक कामगाराचे नाव आहे. त्याच्या या प्रामाणिकपणाचे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी सत्कार करून कौतुक केले. 

आळंदी (पुणे) : मंगल कार्यालयात सापडलेले सोन्याच्या 15 तोळ्यांच्या दागिन्यांचे पाकीट सफाई कामगाराने प्रामाणिकपणे परत केले. सागर एकनाथ किदरे असे या प्रामाणिक कामगाराचे नाव आहे. त्याच्या या प्रामाणिकपणाचे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी सत्कार करून कौतुक केले. 

आळंदीचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे यांच्या मुलीचा विवाह भोसरीतील स्मृती मंगल लॉन्समध्ये रविवारी (ता. 1) सायंकाळी झाला. त्या वेळी कुऱ्हाडे यांच्या एका पाहुण्यांचे सोन्याच्या 15 तोळे दागिन्यांचे पाकीट लग्नाच्या गडबडीत हरविले. दरम्यान, विवाह मंडपात काम करणाऱ्या किदरे यांना हे पाकीट सापडले. त्यांनी नवरी मुलीच्या खोलीमधील कुऱ्हाडे यांच्या पाहुण्या शैला लांडगे यांच्याकडे ते परत केले.

त्यानंतर विवाह मंडपातील निवेदकाने सापडलेल्या दागिन्यांच्या पाकिटाबाबत ध्वनिक्षेपकावरून वऱ्हाडींना कल्पना दिली. यावर तळेगाव दाभाडे येथील एकाने ओळख पटवून दागिने आपलेच असल्याची खात्री दिली. त्यानंतर दागिन्याचे पाकीट त्यांच्या ताब्यात दिले. किदरे यांच्या प्रामाणिकपणाची वऱ्हाडींनी वाहवा केली. त्यांना प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस देऊ केले, मात्र त्यांनी ते नाकारले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gold jewelry found was returned by a sweeper