चेन्नई एक्‍स्प्रेसमधून अडीच कोटींचे सोने जप्त

चेन्नई एक्‍स्प्रेसमधून अडीच कोटींचे सोने जप्त

पुणे - चेन्नई एक्‍स्प्रेसमधून मुंबईला नेण्यात येत असलेले अडीच कोटी रुपये किमतीचे साडेआठ किलो सोने पुणे लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले. येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आल्याची माहिती लोहमार्गाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.

गोविंद प्रेमाराम प्रजापती (वय 35, रा. काळाचौकी, मुंबई), विपुल जेठमल रावल (वय 19, रा. तखतगड, जि. पाली, राजस्थान) आणि प्रतापसिंग कालुसिंग राव (वय 27, रा. बेयणा, ता. मावली, जि. उदयपूर, राजस्थान) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे लोहमार्गाचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत व उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल क्षीरसागर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे स्थानकावर खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक सातव, सहायक फौजदार बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, भीमाशंकर बमनाळीकर, मिलिंद आळंदे, गणेश शिंदे, अशोक गायकवाड, अमरदीप साळुंके आणि कैलास जाधव यांचे पथक प्लॅटफॉर्मवर गस्त घालत होते. तपासणीदरम्यान प्लॅटफॉर्म एकवर आलेल्या चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये एका बोगीत तिघे जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली. त्यात सोन्याच्या 140 बांगड्या, नेकलेस, राणीहार आणि 24 कॅरेट सोन्याच्या पट्ट्या आढळून आल्या. या दागिन्यांचे वजन साडेआठ किलो असून, त्याची किंमत दोन कोटी 49 लाख रुपये इतकी आहे.

सोने कुणाकडून आणले?
गोविंद प्रजापती हा कुरिअर कंपनीत कामास असून, त्याच्याकडे मौल्यवान ऐवज नेण्याचा परवाना आहे. तो हे दागिने मुंबईच्या जव्हेरी बाजारातील प्रकाश जैन या सराफाला देणार होता; परंतु त्याने हे सोने चेन्नईतून कोणाकडून आणले, याबाबत त्याने अद्याप माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com