भिशीचालक ते गोल्डमन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पिंपरी - जागतिक विक्रमाच्या हौसेतून एक कोटी 27 लाख रुपयांचा सोन्याचा साडेतीन किलोचा शर्ट 2012 मध्ये शिवला आणि भोसरीतील दत्ता फुगे हा भिशीचालक रातोरात उद्योगनगरीचा पहिला मोठा गोल्डमन बनला. त्यातून प्रसिद्धी मिळाली, मात्र तेथेच त्याचे ग्रह फिरले. देणेकरी मागे लागले. पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला. गुन्हे दाखल झाले. प्राप्तिकर विभागाने चौकशी केली आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोल्डमनला आपला हाच शर्ट पुन्हा संबंधित ज्वेलर्सकडे ठेवण्याची वेळ आली. ज्या वेगाने प्रगती आणि प्रसिद्धीच्या झोतात फुगे आला, तेवढ्याच वा त्यापेक्षाही अधिक वेगाने त्याची अधोगती झाली.

शहरात सर्वत्र सुरू असलेल्या भिशीतूनच त्याने आपल्या साम्राज्याचा पाया रचला. त्यातून त्याने लाखो रुपयांची उलाढाल सुरू केली. त्याजोडीला तो सावकारी करू लागला. व्याजाने पैसे देण्यास सुरवात केली. दरम्यान, चिटफंड कंपन्यांचे पेव फुटले होते. त्यानेही वक्रतुंड नावाची चिटफंड कंपनी सुरू केली. त्याच बरोबर मुलाच्या नावे शुभम फायनान्स कंपनी सुरू केली. एकूणच वित्तीय बाजारात त्याचे मोठे नाव झाले. भरपूर पैसा जमा झाला. त्यातून अनेकांना त्याने मदत केली. त्यामुळे काहीजणांच्या दृष्टीने तो "मसिहा‘ ठरला. त्याला सोन्याची हौस होती. दरम्यान, दोन किलो सोने अंगावर घालणाऱ्या "मनसे‘चे आमदार रमेश वांजळे यांचा गवगवा झाला होता. त्यापेक्षा अधिक सोने अंगावर घालून विक्रम करण्याच्या हेतूने त्याने 2012 मध्ये शर्टची ऑर्डर दिली. 15 कारागीरांनी 15 दिवस रात्रंदिवस काम करून साडेतीन किलो वजनाच्या सोन्यातून शर्ट तयार केला. पत्रकारपरिषद घेऊन फुगेने तो मीडियाला दाखविला. दरम्यान, त्यांची पत्नी सीमा नगरसेवक झाल्या होत्या. मात्र, त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आणि फुगे याचेही ग्रह फिरले. तेथूनच त्याला उतरती कळा लागली.
मोठा परतावा देतो, असे सांगून अनेकांकडून त्याने चिटफंड कंपनीत पैसे घेतले होते. त्यातील अनेकांना परतावा सोडा, मूळ मुद्दलाची रक्कमही त्याने दिली नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. इतरही अवैध धंद्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डवर तो गेला. त्यातून त्याला तडीपारीची नोटीस आली. दुसरीकडे अनेकांशी वैमनस्य निर्माण झाले होते. शर्टामुळे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीलाही सामोरे जावे लागले. मात्र, शर्ट धनादेश देऊन शिवल्याने तसेच त्या रकमेचा हिशेब दिल्याने चौकशीतून तो वाचला. देणेकरी वाढले. पत्नीचे नगरसेवकपद गेल्याने फुगे यांचेही पुढारीपण गेले. वलय संपले आणि त्याचा आलेख खाली येऊ लागला. गुंड आणि पोलिसही पैशासाठी धमकावत असल्याचे तो खासगीत सांगू लागला. परिणामी हौस आणि रेकॉर्डसाठी शिवलेला सोनेरी शर्ट पुन्हा त्या सराफाकडेच ठेवण्याची वेळ त्याच्यावर आली. नुकताच जवळच्या परिचित देणेकऱ्यांशी त्याचा वाद झाला होता. त्याची परिणती कालच्या हल्ल्यात झाली.

Web Title: goldman