गोल्फ क्‍लब चौकाला कोंडीचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पुणे - गोल्फ क्‍लब चौक ते जेल रस्ता चौक या परिसरात अवजड वाहतूक आणि दररोजच्या कोंडीमुळे वाहतूक असुरक्षित बनली आहे. शास्त्री रस्ता ते गोल्फ क्‍लब चौकादरम्यान रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोंडीतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक शाखेच्या संबंधित विभागाकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहतूक शाखेने यापूर्वी गोल्फ क्‍लब ते शास्त्रीनगर पोलिस चौकीदरम्यान अवजड वाहनांना बंदी घातली होती. मात्र, काही महिन्यांपासून या रस्त्यावर अवजड वाहतूक पूर्ववत सुरू आहे. या भागात आयटी आणि कॉल सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. शास्त्रीनगर चौकापासून गुंजन चौकापर्यंत नगर रस्तामार्गे अवजड वाहतूक वळविल्यास कोंडी कमी होईल. 

गोल्फ क्‍लब चौकात सकाळी आणि सायंकाळी विविध रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे ‘पीक अवर्स’मध्ये गोल्फ क्‍लब चौकात सिग्नलला वाहनांच्या रांगा दीपक फर्टिलायझर्स चौकापर्यंत असतात. वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलचे सुसूत्रीकरण केल्यास गोल्फ क्‍लब चौकातील
वाहने वेळेत निघून जातील. ही समस्या मार्गी लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या येरवडा विभागातील अधिकारी लक्ष देणार का, असा प्रश्‍न या परिसरातील वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
 
समस्या
गोल्फ क्‍लब ते शास्त्रीनगर चौकादरम्यान अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी 
गोल्फ क्‍लब चौकात सिग्नलला वाहनांच्या लांबलचक रांगा

उपाय
अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविणे गरजेचे 
वाहनांची गर्दी लक्षात घेऊन सिग्नलचे सुसूत्रीकरण करणे आवश्‍यक
 
वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन

या चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. बहुतांश वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबलेले असतात. लाल सिग्नल सुरू असूनही काही चालक सिग्नल तोडून निघून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: golf club chowk traffic jam