'रसिकांचा सन्मान मिळविणारा खरा कलावंत'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मी किशोरी अमोणकर यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. रोजचा रियाज त्या करून घ्यायच्या. प्रत्येक वेळी नवीन पैलू शिकायला मिळायचे. त्या गुरू म्हणून लाभल्या नसत्या, तर मी आज गायक म्हणून घडलो नसतो. त्या खऱ्या अर्थाने गानसरस्वती आहेत. त्या माझ्या गुरू आहेत हे माझे भाग्याच आहे. 
-रघुनंदन पणशीकर

पुणे - ""ज्या कलाकाराला जगण्याचा आणि रसिकांचा सन्मान मिळतो, तोच खरा कलावंत, असे बाबा म्हणायचे. तुला आनंद मिळेल, त्या क्षेत्रात काम कर, असे प्रोत्साहनही ते द्यायचे. त्यामुळे मी गायक होऊ शकलो. मी प्रभाकर पणशीकर यांचा मुलगा म्हणून आणि पणशीकर घराण्यात जन्मलो हे माझ्यासाठी पुरस्कारासारखे आहे,'' अशी भावना शास्त्रीय गायक आणि प्रभाकर पणशीकर यांचे पुत्र रघुनंदन पणशीकर यांनी सोमवारी व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या आठवणींना उजाळा देत रघुनंदन यांनी त्यांच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. 

"पूना गेस्ट हाउस स्नेह मंचा'तर्फे आयोजिलेल्या कार्यक्रमात रघुनंदन यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. प्रभाकर पणशीकरांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडले, तर आपल्या गायकीतील सुरेल वाटचालीवरही दृष्टिक्षेप टाकला. गप्पांच्या मैफलीत त्यांनी गानस्वरस्वती किशोरी अमोणकर यांनी केलेले सुरेल संस्कार, त्यातून गवसलेला स्वतःमधील गायक आणि एक गुरू म्हणून त्यांनी दिलेला उज्ज्वल वारसाही बोलका केला. अभिनेत्री आशा काळे, लेखिका सुलभा तेरणीकर, अप्पा कुलकर्णी आणि चारुकाका सरपोतदार यांनीही प्रभाकर पणशीकर यांच्या आठवणी जागवल्या. 

रघुनंदन म्हणाले, ""अभिनय व संगीताचा एक अभिजात वारसा मला लहानपणापासून लाभला. माझ्या पणजोबांपासून ते वडिलांपर्यंत अनेकांनी कला क्षेत्राला खूप काही दिले. त्यातूनच मी घडू शकलो. बाबा स्मरणशक्तीचे बादशहा होते. ते सदैव लोकांना एकत्रित घेऊन चालायचे.'' 

काळे म्हणाल्या, ""मी 50 वर्षे अभिनय क्षेत्रात भक्कमपणे उभी आहे ते रसिकांमुळे. प्रभाकर पणशीकरांनी दिलेल्या "बेईमान' नाटकातील बचुलीच्या भूमिकेमुळे माझी या क्षेत्रातील वाटचाल खऱ्या अर्थाने उभी राहू शकली. इतकी वर्षे या क्षेत्रात टिकू शकले, ते पणशीकर यांच्यामुळे.'' 

Web Title: Good actor to win the highlight of honor