"चांगल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रोत्साहन द्यावे' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : दूरचित्रवाणी हे सध्याच्या काळात जणू उद्योगधंद्याचेच माध्यम बनले आहे. आजचा प्रेक्षक हा दांभिक मालिकांच्या आहारी गेला आहे. अशा परिस्थितीत जर चांगल्या कलाकृती निर्माण होत नसतील, तर तो दोष स्वतः प्रेक्षकांचाच ठरतो. हे चित्र बदलायचे असल्यास प्रेक्षकांनी चांगले चित्रपट पाहणे, उत्तम पुस्तके वाचणे आणि त्यावर आधारित कलाकृतींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. 

रविवारी 15 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) आयोजित "माध्यमांतर' विषयावरील चर्चासत्रादरम्यान दिग्दर्शक महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, रवी जाधव, संजय कृष्णाजी पाटील आदींनी ही मते मांडली. गाजलेल्या साहित्यावर अथवा नाटकावर आधारित चित्रपट करताना त्याचा आशय ध्यानात घेणे गरजेचे आहे. कलाकृती ज्या माध्यमात सादर करावयाची आहे, त्याची बलस्थाने व मर्यादा लक्षात घेऊनच माध्यमांतर करावे, असेही ते म्हणाले. 

कुलकर्णी म्हणाले, "प्रत्येक माध्यमाची बलस्थाने-मर्यादा ओळखून त्यातील आशय लक्षात घेऊन माध्यमांतर झाल्यास त्या कलाकृतीला योग्य न्याय मिळू शकतो. माध्यमांतर करताना दोन्ही माध्यमांतील नियमांचा अभ्यास हवा. एखाद्या घटनेतून, कादंबरीतून, नाटकातून, लघुकथेतूनही कलाकृतीच्या निर्मितीची बीजे मिळू शकतात.'' 
मांजरेकर म्हणाले, "नाटक ते सिनेमा ही माध्यमांतराची प्रक्रिया अवघड असते. आज साहित्यकृती चांगल्या दर्जाच्या होत नाहीत, म्हणून माध्यमांतराची गरज आहे, असे मानणे चुकीचे आहे. विषय संपलेले नाहीत. त्या विषयापलीकडे, स्टेजपलीकडे जाऊन चित्रपटांची निर्मिती करणे गरजेचे आहे.'' 

अग्रलेख आणि भाषणांवरसुद्धा होईल चित्रपट ! 

कुलकर्णी म्हणाले, "घेतले एखादे नाटक आणि केला त्यावर चित्रपट असे होत नसते ! त्यासाठी त्या-त्या माध्यमाची भाषा अन्‌ समज अवगत असावी लागते. केवळ रूढ साहित्यच नव्हे, तर अग्रलेख आणि भाषणांवरसुद्धा एखादा उत्तम चित्रपट होऊ शकतो. विषय आणि आशय महत्त्वाचा. प्रत्येक कलाकृतीचे माध्यमांतर होऊ शकते, असा समज चुकीचा आहे. प्रत्येक माध्यमाचा पोत वेगवेगळा असणार हे जाणून घेतले पाहिजे.'' 
 
Web Title: good movies shall get praise