बळिराजाच्या पाठीवर ‘आपुलकी’चा हात

नंदकुमार सुतार
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - शेतीचा शाश्‍वत विकास झाल्याखेरीज संपूर्ण समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, हे आता सर्वांना पटू लागले आहे. त्यामुळे जनजागृती वाढून याबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जात असतानाच, काही जण यावर उपाय सुचवून प्रत्यक्ष काम करू लागले आहेत. बळिराजाच्या पाठीवर ‘आपुलकी’चा हात फिरवणारी एक संस्था अलीकडच्या काळात आकारात आली आणि तिचे विविध उपक्रम शेतकऱ्यांना चांगला दिलासा देणारे ठरत आहेत.

पुणे - शेतीचा शाश्‍वत विकास झाल्याखेरीज संपूर्ण समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, हे आता सर्वांना पटू लागले आहे. त्यामुळे जनजागृती वाढून याबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जात असतानाच, काही जण यावर उपाय सुचवून प्रत्यक्ष काम करू लागले आहेत. बळिराजाच्या पाठीवर ‘आपुलकी’चा हात फिरवणारी एक संस्था अलीकडच्या काळात आकारात आली आणि तिचे विविध उपक्रम शेतकऱ्यांना चांगला दिलासा देणारे ठरत आहेत.

पुण्यात नुकताच संत्रा महोत्सव सुरू झाला. नागपूरची संत्री शेतकऱ्यांच्या शेतातून थेट पुणेकरांच्या हातात पोचवायचे काम याच संस्थेने संत्रा महोत्सवाच्या माध्यमातून हाती घेतले. ही संस्था म्हणजे ‘आपुलकी’. या महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अभिजित फाळके यांची भेट झाली आणि ‘आपुलकी’ची वाटचाल आणि त्यामागील प्रेरणा उलगडत गेली. 

‘आपुलकी’ ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. फाळके यांच्यासह संस्थेतील कोणीही शेतकरी नाही, हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य. आजघडीला संस्थेमध्ये दोनशेवर सक्रिय सदस्य आहेत, तर जगभरात सुमारे साडेसात हजार ‘आयटी इंजिनिअर’ संस्थेशी जोडलेले आहेत. स्वत: फाळके लंडनमध्ये काही वर्षे काम करत होते; पण त्यांचे मन जन्मभूमीतील शेतकऱ्यांमध्ये अडकल्याने त्यांनी येथे परत येऊन शेतकऱ्यांसाठी काम सुरू केले आणि सहकारी तेवढ्याच तळमळीचे मिळाल्याने त्यांना यश मिळत गेले आणि आज शेतकऱ्यांना ही संस्था मोठा आधार वाटत आहे. 

अभिजित फाळके हे विदर्भातील... त्यांच्या कुटुंबाकडे शेती वगैरे नव्हती, म्हणून त्यांच्या आईने इतरांच्या शेतात काबाडकष्ट केले. आईची आठवण निघताच फाळके यांना हुंदका दाटून आला. शेतीसाठी काम करण्याची प्रेरणा सर्वांत आधी आईकडूनच मिळाली, हे ते आवर्जून सांगतात. त्यांना शेतीकडे आकृष्ट करणारी आणखी घटना खूपच प्रेरणादायी ठरली. ११ सप्टेंबर २०११ रोजी ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेत यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेने सुमारे सहा लाखांचे बक्षीस जिंकले होते. या रकमेचे काय करणार, या अमिताभ बच्चन यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना या शेतकरी महिलेची मन सुन्न करणारी कहाणी जगासमोर आली. शेतीने साथ न दिल्याने तिच्या पतीने आत्महत्या केली, तेव्हा ती २५ वर्षांची होती. तिला पतीने काढलेल्या कर्जाबद्दल काहीही कल्पना नव्हती. या स्थितीत कुटुंबाने आधार देण्याऐवजी तिला घरातून बाहेर काढले आणि ती दोन चिमुरड्यांसह उघड्यावर आली. रोजंदारी करून दोन्ही मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प करत तिने जगण्याची उमेद सोडली नाही.

या घटनेने फाळके यांना हेलावून सोडले. दुसऱ्याच वर्षी म्हणजे २०१२ मध्ये ‘आयटी’तील मित्रांना सोबत घेऊन त्यांनी ‘आपुलकी’ची स्थापना केली.

२८ शेतकऱ्यांचे कर्ज फेडले
विदर्भातील २८ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याने ही संस्था सर्वांना समजली. त्यासाठी त्यांनी साधी युक्ती वापरली. फाळके सांगतात, ‘‘संस्थेच्या फेसबुक पेजवरून शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले आणि दोन-अडीच महिन्यांत देश-विदेशातील मित्रांनी हात पुढे केला. वीस-बावीस लाखांची रक्कम जमा झाली. अत्यंत गरजवंत असलेल्या आणि आत्महत्येच्या घटना घडलेल्या शेतकरी कुटुंबांची निवड केली. त्यांच्या बॅंकेच्या खात्यात पैसे जमा केले. थकबाकी संपल्याने त्यांना नवे कर्ज मंजूर झाले. संस्था यावरच थांबली नाही, तर हे सर्व शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, म्हणून पाठपुरावा सुरूच असल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.’’ 
 ‘आपुलकी’ने पुढे टाकलेले एक पाऊल बळिराजाच्या रुक्ष आयुष्यात ओलावा निर्माण करणारे ठरते आहे. अशा अनेक संस्था पुढे आल्या, तर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

शेतकऱ्यांना मिळतोय मानसिक आधार
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे संस्थेचे ब्रीद आहे. त्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आणि लहान मुलांना मदत दिली जाते. शेती प्रदर्शने, कार्यशाळा, जागृती अभियान, माझी संवेदना, प्रकाशवाट, संत्रा महोत्सव असे अनेक कार्यक्रम घेण्यासोबतच संस्थेने कृषी अवजारे बॅंकदेखील स्थापन केली आहे. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पादन यासाठी मार्गदर्शन, शेतीमालाला मध्यस्थांशिवाय बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी संस्था प्रयत्न करते, तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचेही काम करते.

Web Title: A good variety of activities that benefit farmers