‘गुडविल इंडिया’मार्फत गरिबांना जगण्याची संधी देणारे कालिदास मोरे

गुडविल इंडियाच्या कॅन्टीनच्या उद्‌घाटन प्रसंगी मान्यवर.
गुडविल इंडियाच्या कॅन्टीनच्या उद्‌घाटन प्रसंगी मान्यवर.

शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन उपक्रम ‘गुडविल इंडिया’च्या माध्यमातून सुरू केले.

नोकरीतून सामाजिक कामात
मोरे यांनी त्यांच्या जीवनाची सुरवात राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये नोकरीला लागून केली. वेगवेगळ्या पदांवर वीस वर्षे काम करताना त्यांना अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रसंग आला. तेथे गरिबांच्या मदतीसाठी ‘गुडविल’ नावाची मोठी सामाजिक संस्था कार्यरत असून, तिचे कार्य त्यांनी पाहिल्यानंतर असेच कार्य आपल्या भारतामध्ये सुरू करण्यासाठी व समाजहितासाठी त्यांनी बॅंकेचा राजीनामा देऊन ‘गुडविल इंडिया’ची स्थापना केली. हा उपक्रम भारतात राबवून गरीब जनतेला दिलासा देता येईल, त्यांना चांगल्या कपड्यांत पहाता येईल, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. त्याप्रमाणे त्यांनी शिवणे येथील महिला बचत गटातील चार महिलांच्या मदतीने हे कार्य सुरू केले. 

कपडेवाटप योजना
या उपक्रमाअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड भागात वापरलेले कपडे २० कलेक्‍शन सेंटरमधून गोळा केले जातात. त्यासाठी पाच टेम्पोंचा नियमित वापर केला जातो. आतापर्यंत सुमारे २२ लाख कपडे गोळा करण्यात आले आहेत. हे कपडे आल्टर, धुवून, इस्त्री करून चांगले तयार करून जवळपास १६ लाख कपडे गरीब, पूरग्रस्त, आदिवासी, विद्यार्थी व वृद्धाश्रम अशा अनेक ठिकाणी वाटप करण्यात आले. त्याचवेळी एका आठवड्यात २ लाख ९३ हजार कपडे गोळा करून जागतिक विक्रम करण्यात आला. त्याची नोंद 
‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालेली आहे. आतापर्यंत तयार केलेली कपडे गडचिरोली, केरळ पूरग्रस्त, पालघर पूरग्रस्त, सांगली- कोल्हापूर पूरग्रस्त, उत्तराखंड पूरग्रस्त, नाशिक आदिवासी आश्रम या ठिकाणी हजारोंच्या संख्येत ही कपडे देण्यात आली. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गरीब वस्त्यांमध्ये कपड्यांचे रोज गुडविल इंडियातर्फे वाटप करण्यात येते.

कन्यारत्न विवाह मदत योजना
समाजामध्ये पुष्कळशी कुटुंबे अत्यंत हलाखीत जगत असतात. घरामध्ये दोन किंवा काही ठिकाणी तीन मुली लग्नाच्या असतात. आईवडील व मुलीदेखील लग्नाच्या फार मोठ्या चिंतेत असतात. याचे एक गंभीर उदाहरण द्यायचे झाल्यास मध्य प्रदेशमध्ये आईवडील लग्न करून देण्यास हताश झालेले पाहून एकाचवेळी घरातील तीन मुलींनी आत्महत्या केली. अशी मन हेलावून टाकणारी अनेक उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत ‘गुडविल इंडिया’ या मुलींच्या मदतीस उभी राहते  व कुटुंबातील पाच सदस्यांना पुरेल इतका पूर्ण किचन भांड्याचा संसार, लग्नात शोभेल अशी साडी व चप्पल मोफत त्या मुलीला भेट दिली जाते. आतापर्यंत ३७५ गरजू मुलींना याप्रकारे लग्नात मदत करण्यात आली. या मुली पुणे व पुणे जिल्हा; तसेच सोलापूर, बीड, उस्मानाबाद अशा दुष्काळी भागातीलही आहेत. आतापर्यंत या उपक्रमात बालन ग्रुप, पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन, योगीराज पतसंस्था, ताथवडे गार्डन ग्रुप अशा अनेक दानशूर व्यक्ती व संस्थानी पुढे येऊन मदत केली आहे. या योजनेला दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

रोजगारनिर्मिती व इतर उपक्रम
या उपक्रमाअंतर्गत शिवणे, उत्तमनगर या भागातील जवळपास ८० लोकांना गुडविल इंडियामार्फत कालिदास मोरे यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये ५० महिला व ३० पुरुष काम करत असून, त्यांना कपडे, शैक्षणिक मदत, मेडिकल व राहण्याच्या अशा अनेक सुविधाही पुरविल्या जातात; तसेच विद्यार्थी व शाळा यांना आतापर्यंत ३० संगणक वाटप करण्यात आले. 

शहरातील ‘सकाळ’चा उपक्रम बस डे, ट्राफिक पोलिसांची फुफ्फुसतपासणी असे अनेक कार्यक्रम गुडविलने राबविले. या गुडविल इंडियाच्या उपक्रमाला डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, विजय पाटकर, सिंधुताई सपकाळ, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, भाई जगताप, आमदार भीमराव तापकीर, पांडुरंग बलकवडे, समीर लडकत, विवेक वेलणकर, जयंत पवार अशा अनेक मान्यवरांनी संस्थेला भेटी दिल्या आहेत.  

पूरग्रस्त, आदिवासी व वंचितांच्या मदतीसाठी कलेक्‍शन कॅम्प -
१. कपडे २. धान्य ३. खेळणी ४. भांडी ५. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू ६.चप्पल शूज ७. फर्निचर ८. पुस्तके यासाठीचा कलेक्‍शन कॅम्प

ठिकाण - फर्ग्युसन कॉलेज मेन गेटशेजारी, दि. १३ ऑक्‍टोबर, वेळ स. १० ते सायं.सहापर्यंत.  

 (शब्दांकन - महादेव पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com