esakal | Vidhan Sabha 2019 : बारामतीचा सर्वांगीण विकास भाजपच करू शकतो : पडळकर
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : बारामतीचा सर्वांगीण विकास भाजपच करू शकतो : पडळकर

देशात नरेंद्र मोदी यांच्या व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खऱ्या अर्थाने विकास केला आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करु शकतो.

- गोपीचंद पडळकर, उमेदवार, भाजप

Vidhan Sabha 2019 : बारामतीचा सर्वांगीण विकास भाजपच करू शकतो : पडळकर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती शहर : देशात नरेंद्र मोदी यांच्या व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खऱ्या अर्थाने विकास केला आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करु शकतो, त्यामुळे भाजपचे हात बळकट करुन विजयी करण्याचे आवाहन भाजपचे बारामतीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर यांनी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारपासून ते बारामती शहरात पदयात्रांद्वारे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आज जळगाव कडेपठार येथे झालेल्या सभेत पडळकरांनी बारामतीतील पवार कुटुंबियांचा दादागिरी संपवून ख-या अर्थाने विकासप्रक्रिया सुरु करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. 

पडळकर म्हणाले, बारामतीचा विकास झाला असे सांगितले जाते. मात्र, आजही जिल्ह्यात सर्वाधिक टँकर बारामतीत असतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी टंचाईग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी आराखडा तयार केलेला आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे, पवार कुटुंबियांच्या ताब्यातील कारखाने माळेगाव इतका भाव देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी आता बारामतीतही परिवर्तनाची गरज आहे. 
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे. त्यामुळे बारामतीतही विकासाची गंगा आणायची असेल तर येथेही भाजपचाच आमदार गरजेचा आहे.

गेली अनेक वर्षे अनेक कार्यकर्त्यांनी काम करुनही विधानसभा व लोकसभेच्या वेळेस पवार कुटुंबिय वगळता इतरांना का संधी दिली जात नाही, असा सवाल करत ही घराणेशाही संपविणे गरजेचे आहे, असे आवाहन प़डळकरांनी केले. 

पडळकर यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे, दिलीप खैरे, कुलभूषण कोकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. 

युवकांचा लक्षणीय प्रतिसाद

बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला असून, बारामतीची हवा बदलली आहे. मतदानानंतर चित्र बदललेले दिसून येईल, पडळकर यांनी सांगितले.

loading image