दिव्यांगांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध - प्रेरणा देशभ्रतार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बालआनंद मेळाव्याचे आयोजन
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी या वेळी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिन राऊत यांनी दिव्यांगांच्या कायदेविषयक अधिकाराविषयी माहिती दिली. तर मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने उपस्थित दिव्यांग मुलांबरोबर संवाद साधला. एपिक क्‍लबकडून विविध मनोरंजनात्मक खेळ, टॅटू, नृत्य यांसारखे उपक्रम राबवून मुलांसाठी आगळेवेगळे आनंददायी वातावरण निर्माण केले होते. या वेळी मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मुलांना अल्पोपाहार व बालकल्याण संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

औंध - ‘आरोग्य, शिक्षण व चांगल्या सुविधा मिळणे हा दिव्यांगांचा हक्क आहे. त्या हक्काचा जागर करण्याचा आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकारी पातळीवर अंमलबजावणी व मदत करण्यासंदर्भात आम्ही कटिबद्ध आहोत’, असा विश्‍वास दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिव्यांग विद्यार्थी, त्यांच्यासाठी कार्यरत संस्था व पालक यांना दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

औंध येथील बालकल्याण संस्थेत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे व बालकल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव व ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सर्व विश्‍वस्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, मराठी सिनेअभिनेत्री स्पृहा जोशी, उद्योजक हनुमंतराव गायकवाड, दिव्यांग चेंबर ऑफ कॉमर्सचे (डिक्काई) रघुनाथ येमूल गुरुजी उपस्थित होते.

देशभ्रतार म्हणाल्या, ‘सध्या दिव्यांग यादीत काही प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यांनाही यात सामावून घेतले जाईल. तसेच सरकारी यंत्रणेसह सर्वच पातळीवर दिव्यांगांसाठी तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्याचबरोबर राज्यभरात दिव्यांगांसाठी एकात्मिक अभ्यासक्रम तयार करून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कटिबद्ध आहोत, असेही त्या म्हणाल्या. 

सुरवातीला प्रतापराव पवार यांनी संस्थेच्या कार्याची तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामगिरीची प्रास्ताविकातून माहिती दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील ८५ विशेष शाळा व कार्यशाळेतील साडेतीन हजार दिव्यांग बालके व दिव्यांग क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी साडेतीनशे दिव्यांग बालकांनी नृत्य, समूहवादन, समूहगान व शारीरिक मनोरे सादर करून सर्वांची मने जिंकली. संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास दिव्यांग बालक, शिक्षक व पालकांसह नागरिक उपस्थित होते.

दिव्यांग विकासासाठी डिक्काईच्या वतीने दीड लाखाचा निधी बालकल्याण संस्थेला रघुनाथ येमूल गुरुजी यांनी दिला. या कार्यक्रमात सिनेक्रॉन कंपनी व एपिक संस्थेच्या प्रत्येकी पन्नास विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुमठेकर यांनी केले. तर संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government is committed to the development of the disabled prerana deshbhratar