वर्षभरात चारच ग्रामसभा घेण्याचे सरकारचे निर्देश

मिलिंद संगई
शनिवार, 28 एप्रिल 2018

दुसरीकडे 26 जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या दिनांकास नियमित ग्रामसभा घेऊ नयेत असेही निर्देश एका अध्यादेशाद्वारे शासनाने जारी केले आहेत. 

बारामती : ग्रामसभांद्वारे परिणामकारक निर्णय व्हावेत यासाठी ग्रामसभांची संख्या मर्यादीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पुढील काळात नियमानुसार मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व 26 जानेवारी अशा चारच ग्रामसभा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. 

दुसरीकडे 26 जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या दिनांकास नियमित ग्रामसभा घेऊ नयेत असेही निर्देश एका अध्यादेशाद्वारे शासनाने जारी केले आहेत. 

शासनाने नमूद केलेल्या चार ग्रामसभांव्यतिरिक्त कोणत्याही विभागास विशेष ग्रामसभा आयोजित करायची असेल तर त्यांनी त्यांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवून पूर्वपरवानगी घेऊन आयोजित करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. कोणत्याही विभागाने परस्पर जिल्हा परिषदांना विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत निर्देश दिल्यास अशा ग्रामसभा आयोजित करण्यापूर्वी ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्याच्या महत्वाच्या तसेच फ्लॅगशिप योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरिता व ग्रामसभेच्या विषयसूचीतील विषयांवर सर्वंकष चर्चा घडवून आणण्याकरीता ग्रामस्थांचा सहभाग वाढवून त्याला चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी हे बदल केल्याचे या अध्यादेशात नमूद केले आहे. ग्रामसेवकांवर पडणारा अतिरिक्त ताण व अनेकदा ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते याचा विचार करुनही हा निर्णय शासनाने घेतला आहे.

Web Title: government decision on gramsabha in Maharashtra