"जेनेरिक'च्या प्रसाराबाबत शासन उदासी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - सरकारी रुग्णालयांमधून जेनेरिक औषधे मिळत असली तरी सामान्य रुग्णांपर्यंत ही औषधे पोचविण्यात शासकीय यंत्रणा उदासीन असल्याची चित्र दिसत आहे. सरकारी खात्याने जेनेरिक औषधांच्या प्रचारासाठी आणि त्याच्या विश्‍वासार्हतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

पुणे - सरकारी रुग्णालयांमधून जेनेरिक औषधे मिळत असली तरी सामान्य रुग्णांपर्यंत ही औषधे पोचविण्यात शासकीय यंत्रणा उदासीन असल्याची चित्र दिसत आहे. सरकारी खात्याने जेनेरिक औषधांच्या प्रचारासाठी आणि त्याच्या विश्‍वासार्हतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

आरोग्य खात्यातर्फे खरेदी करण्यात येणारी बहुतांश औषधे ही जेनेरिक असतात. ताप, थंडी, सर्दी, खोकला यासह लहान मुलांची आणि प्रसूतीसाठी लागणाऱ्या औषधांचा यात समावेश असतो. जेनेरिक औषधांच्या खरेदीतून सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपयांची बचत होते; पण ही औषधे सामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सरकारची कोणतीही यंत्रणा नाही, असा तक्रारीचा सूर "सकाळ'ने घेतलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. 
जेनेरिक औषधांचा सरकारने प्रचार केल्यास त्याची विश्‍वासार्हता वाढेल. लोकांच्या मनात जेनेरिकबाबत असलेले गैरसमज दूर होतील. त्याचा थेट परिणाम जेनेरिकची मागणी वाढण्यात होईल, असा विश्‍वास लोकांनी या सर्वेक्षणात व्यक्त केला. 

जेनेरिकच्या नावाखाली काही दुकानांमधून स्वस्तातील औषधांची विक्री होत असल्याचे निरीक्षण काही ग्राहकांनी नोंदविले. ही औषधे खरंच जेनेरिक आहेत का, असा प्रश्‍न बहुतांश ग्राहकांना पडला आहे. त्यामुळे स्वस्तातील औषधे खरेदी करून रुग्णांना देण्यापेक्षा महागडी औषधे खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचेही ग्राहकांशी साधलेल्या संवादातून पुढे आले आहे. 

""डॉक्‍टरांनी लिहून दिलेली औषधे परवडत नाहीत; पण स्वस्तातील औषधांवर विश्‍वास नाही. त्यामुळे ती औषधे घेण्याचे धाडस होत नाही. त्यातून काही दुष्परिणाम झाल्यास उपचारांचा खर्च आणखी वाढण्याचा धोका वाटतो. त्यामुळे सामान्य रुग्णांमध्ये या औषधांबद्दल शंका असतात,'' असे सिंहगड रस्त्यावरील दुकानात औषध खरेदीसाठी संतोष काशिद यांनी सांगितले. 

विश्रांतवाडीतील दुकानात आलेले गजानन सातपुते म्हणाले, ""सरकारने स्वस्तातील औषधांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दुकानदारांनी स्वस्तातील औषधे ठेवावीत, त्यामुळे सामान्य रुग्णांना वाढत्या महागाईत थोडाफार का होईना दिलासा मिळेल.'' 

पाषाण येथील मंजूषा गुगळे म्हणाल्या, ""डॉक्‍टरांनी महागाची औषधे लिहून दिली आहेत. दुकानदाराने स्वस्तातील औषधे दिली; पण ती मुलीला द्यायला भीती वाटते. त्यामुळे महागातील निम्मीच औषधे घेतली.'' 

""सरकारी रुग्णालयांमध्ये होणारे जेनेरिक औषधांचे वाटप बाजारातही होईल, अशी व्यवस्था सरकारने उभारली पाहिजे. त्यासाठी औषध दुकानदारांना विश्‍वासात घेतले पाहिजे,'' अशी अपेक्षा औषध दुकानदाराने व्यक्त केली.

Web Title: government depressed for Generic medicine