रुग्णालय सरकारी; मेडिकल खासगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

महापालिका रुग्णालयात पुरेशी औषधे उपलब्ध आहेत. तसेच तातडीक औषधांसाठी वेगळी निविदा असल्याने रुग्णांना आवश्‍यक औषधे उपलब्ध होतात. वायसीएममधील खासगी मेडिकलला पाच वर्षांसाठी जागा दिली असून, त्या वेळी तसा ठराव झाला असेल. 
- मंगेश चितळे, सहायक आयुक्त, महापालिका मध्यवर्ती भांडार आणि भूमी व जिंदगी विभाग

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात चालणारी दुकानदारी, औषधांचा कृत्रिम तुटवडा, हेल्थकार्ड यंत्रणेचा बोजवारा व प्रशासनाच्या या अशा कारभारामुळे अनेकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने वायसीएममधील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणारी वृत्तमालिका आजपासून...

वायसीएम रुग्णालयात ना नफा-ना तोटा या योजनेखाली सुरू केलेल्या खासगी मेडिकलमध्ये रुग्णांची सर्रास लूट होत आहे. सरकारी रुग्णालयात औषधे मिळत असताना येथे खासगी मेडिकलची गरज काय, तसेच यात डॉक्‍टर व प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर, वायसीएम प्रशासनाकडे याबाबतचा करार, ना हरकत, ठराव आदी कोणतीच कागदपत्रे नसल्याचे सांगण्यात आले. 

महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने हे मेडिकल चालवले जाते. महापालिका आजी व माजी कर्मचारी, महापालिका हद्दीतील नागरिकांना पाच टक्के सवलतीत सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात आहे त्याच किमतीत औषधांची विक्री होते. जेनेरीक औषधे मिळतील, असा ठळक फलक लावला असला, तरी अनेक उपलब्ध नसल्याचे सांगून महागडीच औषधे दिली जातात. 

महापालिका रुग्णालयातून अत्यल्प दरात औषधांचे वितरण केले जाते. मात्र, औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रुग्णांना खासगी मेडिकलकडे वळविले जाते, असे काहींचे म्हणणे आहे. 

याबाबत अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ‘‘त्या वेळी वायसीएममध्ये मेडिकल सुरू करण्याची गरज निर्माण झाली असेल. याबाबतच्या कागदपत्रांची माहिती घेणार आहे.’’ 

औषधांसाठी पन्नास लाख 
उपचार घेणारे बहुसंख्य रुग्ण गरीब असतात. अशांना अचानक औषधांची गरज भासल्यास ५० लाखांपर्यंतची औषधे खरेदी करण्याची निविदा उपलब्ध आहे. मात्र, या निविदेतून औषधांची खरेदी न करता खासगी दुकानातून औषधे खरेदी करण्यासाठी सांगितले जाते.

भाड्यात तफावत 
पाच वर्षांच्या मदतीसाठी ३० सप्टेंबर २०१५ मध्ये या मेडिकलला परवानगी दिली. एक हजार ५०० रुपये प्रतिस्क्वेअर फूट या दराने महापालिकेने भाडे आकारले आहे. एकूण २४० स्क्वेअर फूट क्षेत्राचे वर्षाला तीन लाख साठ हजार भाडे होते. मात्र, महापालिका प्रत्यक्षात ७२ हजारच भाडे घेत असल्याचे कागदपत्रात म्हटले आहे. 

खासगी मेडिकल कशासाठी? 
पालिकेने गतवर्षी ११ कोटी ५० लाखांची औषध खरेदी केली. या वर्षी बारा कोटी ५० लाखांची औषधे खरेदी करणार आहे. त्यामुळे रुग्णालयात औषध तुटवडा नसताना येथे खासगी मेडिकल कशासाठी, असा प्रश्‍न विचारला जात आहे. या मेडिकलचे रोजचे उत्पन्न ७५ हजार ते एक लाखांपर्यंत असल्याचे 
बोलले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Hospital and Private Medical