सरकारी रुग्णालयांतही बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पुणे - तुम्हाला वजन कमी करण्याच्या बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेसाठी नजीकच्या काळात मोठ्या रुग्णालयांची पायरी चढावी लागणार नाही. कारण, लवकरच ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयांमधून उपलब्ध होण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. तेथील डॉक्‍टरांना या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची मोहीम ‘ओबेसीटी प्रिव्हेंशन अँड कंट्रोल टास्क फोर्स’तर्फे हाती घेण्यात आली आहे. 

वजन कमी करण्याची बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया ही सध्या फक्त मोजक्‍या बड्या रुग्णालयांमध्ये होतात. ही शस्त्रक्रिया खरं तर जीवरक्षक आहे. पण, त्या बाबत जागृती नसल्याने आतापर्यंत त्याचा समावेश सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांमध्ये केला होता. त्यात बदल झाल्यानंतर या शस्त्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. याला चालना देण्यासाठी ‘ओबेसीटी प्रिव्हेंशन अँड कंट्रोल टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. त्यातून सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सा विभागातील प्रमुखांना बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पुण्यातील ‘लॅप्रो ओबोसे सेंटर’तर्फे (एलओसी) आयोजित केलेल्या देशातील पहिल्या ‘बेस्ट मेटासर्ज २०१८’ या स्थूलता विकारावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत याची 
सुरवात झाली. 

भारतीयांच्या दृष्टीने स्थूलता हा मोठा विकार म्हणून पुढे येत आहे. त्यातून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार वाढतातच, पण रुग्णाला मानसिक आजारही होतात. त्यामुळे नागरिकांमधील वाढत्या स्थूलता विकाराला प्रतिबंधित करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आणि बॅरियाट्रिक शल्यचिकित्सेतील नवोदित शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणे आवश्‍यक आहे. त्यातून देशातील सामान्य रुग्णांसाठी या शस्त्रक्रियेची सुविधा सहजतेने उपलब्ध होईल. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी नवोदित बॅरियाट्रिक शल्यचिकित्सक आवश्‍यक आहेत. त्यामुळे ‘ओबेसीटी प्रेव्हेंशन अँण्ड कंट्रोल टास्क फोर्स’च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक शल्यचिकित्सक

Web Title: government hospital bariatric surgery