...तर तुम्ही उद्याचे ‘टाटा’ होऊ शकाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

तुमच्या डोक्‍यात कोणत्याही व्यवसायाची चांगली कल्पना येण्यासाठी पैशांची गरज लागत नाही. मात्र त्यातून मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. त्यासाठी समाजाच्या गरजा शोधून, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली, तर उद्याचे ‘टाटा’देखील तुम्ही होऊ शकाल, असा संदेश ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पुणे - तुमच्या डोक्‍यात कोणत्याही व्यवसायाची चांगली कल्पना येण्यासाठी पैशांची गरज लागत नाही. मात्र त्यातून मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. त्यासाठी समाजाच्या गरजा शोधून, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली, तर उद्याचे ‘टाटा’देखील तुम्ही होऊ शकाल, असा संदेश ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. आमदार विजय काळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत वानखेडे, संस्थेचे प्राचार्य प्रकाश सायगावकर, आर. एन. वागद्रे, उद्योजिका आनंदी पाटील, ‘टाटा मोटर्स’चे अधिकारी व्ही. सुरेश आदी उपस्थित होते. गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे महत्त्व सांगताना पवार म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान शिकवून उपयोग नाही. विद्यार्थी हुशार असला, तरी त्याला या ज्ञानाचा फायदा होत नाही. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना कोणत्याही क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव महत्त्वाचा आहे. औंध आयटीआय त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, ही चांगली बाब आहे. तुम्ही येथेच न थांबता संस्थेचा मानदंड अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करा.’’

जिद्द बाळगा, यश तुमचेच!
पैसा नाही, व्यवसायाची माहिती नाही, आता मला कसे जमणार, अशी भावना मनात ठेवू नका. या गोष्टींचा अभाव असणे हा गुन्हा नाही; पण अज्ञानी राहणे हा गुन्हा आहे. त्यामुळे जे आपल्याकडे नाही, ते मिळविण्याची प्रचंड जिद्द उराशी बाळगा. मग तुम्हाला जात-पात, वशिला या कशाचीच गरज लागणार नाही आणि जीवनात खूप यशदेखील मिळेल, असा सल्ला प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Industrial Training Institute in Aundh