
इंदापूरचे नाव झळकणार देशाच्या नकाशावर...
वालचंदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांच्या इंदापूरातील गढीचे सात दिवसामध्ये पर्यटन स्थळ घोषित करुन ऐतिहासिक गढीच्या संवर्धनासाठी तातडीने २ कोटी रुपयांची तरतुद करण्याचे आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल लोढा यांनी दिले.
मालोजीराजांचा इतिहासाची नवीन पिढीला ओळख होईल. यामुळे इतिहासाची साक्ष असणाऱ्या इंदापूर शहराच्या इतिहासाला उजाळा मिळणार असून इंदापूरचे नाव देशाच्या नकाशावर झळकणार आहे.
इंदापूरचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूरमधील मालोजीराज्यांच्या गढीची लक्षवेधी सुचना मांडून शासानाचे लक्ष वेधले. भरणे यांनी अधिवेशनामध्ये सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना निजामशाही ने इंदापूर शहर वतन दिले होते.
मालोजीराजे शेवटच्या क्षणापर्यत इंदापूर शहरामध्ये वास्तव्यास होते. १६०६ मध्ये झालेल्या इंदापूर मधील लढाईमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले.मालोजीराज्याच्या गढीसमोर इंद्रेश्वराचे मंदिर होते. मालोजी राजांच्या दिनक्रमाची सुरवात इंद्रेश्वराच्या दर्शनाने हाेत होती.
आज ही येथे इंद्रेश्वराचे मंदिर असून असून मोठी यात्रा भरत असून इंदापूरचे ग्रामदैवत आहे. या सर्व घटनांचा उल्लेख शिवभारत ग्रंथामध्ये आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या इंदाूपर शहरातील इतिहासाला उजाळा देण्यासाठी आजची जुनी तहसील कचेरी असलेल्या मालोजीराजेच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुजांचे पुर्नर्जीवन करुन मालोजीरांच्या स्मारक उभारावे.
गढीचे पुर्नजीवन करावे. पादुकासाठी दगडी चबुतरा उभारण्याची मागणी भरणे यांनी अधिवेशनामध्ये केल्यानंतर पर्यटन मंत्री मंगल लाेढा यांनी भरणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, इंदापूर मधील छत्रपती मालोजी राजे यांच्या गढीचा विषय महत्वाचा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले व गडाच्या संवर्धनासाठी ३५० करोड रुपयांची तरतुद केली आहे. इंदापूरातील मालोजीराज्यांच्या गढीसाठी तातडीने २ कोटी रुपयांची तरतुद करण्यात येईल.
इंदापूरातील मोलीजी राज्यांच्या गढीवर दोन महिन्यात बैठक घेवून गढीच्या संवर्धनासाठी आराखडा तयार केला जाईल. असून बैठकीला महसूल, पर्यटन,सांस्कृतिक विभागाचे मंत्री,अधिकारी उपस्थित राहतील. तसेच ७ दिवसांच्या आत इंदापूरमधील मालोजीराजेंची गढी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करुन सर्व जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले.