
Nafed onion-buying : ‘नाफेड कांदा-खरेदी’ प्रश्नी सरकारचा खोटारडेपणा उघड; गोपाळ तिवारी
पुणे : कांदा उत्पादक शेतकरी पडत्या भावामुळे मेटाकुटीस आला असून, केंद्रासोबतच राज्यातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. ‘शेती विषयक विधेयक’ मागे घ्यावयास लागल्यामुळे शेतकऱ्यांवर सूड उगविण्याचे कारस्थान सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी शनिवारी केला.
मागील वर्षी मार्च -एप्रिल दरम्यान सरकारने नाफेडमार्फत २ लाख ३८ हजार टन कांद्याची खरेदी केली. नफा कमावण्याच्या हेतूने आठ महिन्यानंतर देशातील प्रमुख बाजार पेठांमध्ये तो विक्रीस आणला. परंतु कांदा खराब झाल्याने आणि वजनात घट झाल्यामुळे पर्यायाने सरकारला मोठे नुकसान सोसावे लागले आणि बाजारभाव पडले. त्यामुळेच कदाचित नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा संशय येत आहे.
दुसरीकडे सरकार विधानसभेत कांदा निर्यात सुरू असल्याचे सांगत आहे. परंतु निर्यातीसाठी वाहतूक कंटेनर्सचे भाडे सरकारने तिप्पट वाढवले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरण शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते तिवारी यांनी केली आहे.