पदवीधर माउली रोजगारासाठी मजूर अड्ड्यावर

पदवीधर माउली रोजगारासाठी मजूर अड्ड्यावर

पुणे - ‘‘दुष्काळामुळं गावाकडं कामधंदा नाही. बीएस्सीपर्यंत शिक्षण घेऊनही बेकार होऊन फिरायची वेळ आलीय. नोकरीसाठी पुण्यात आलो; पण इथंही काम मिळेना. शेवटी कोणताच पर्याय दिसेना म्हणून मजूर अड्ड्यावर आलो. इथं नाही म्हणलं तरी आठवड्याला तीन-चार दिवस का होईना हाताला काम मिळतंय; घाम गाळावा लागतो; पण पोटाच्या खळगीचा प्रश्‍न मिटतो...’’

चेहऱ्यावर डबडबलेला घाम रुमालानं टिपत तो सांगत होता. त्याचवेळी त्याच्यावर ‘लाईव्ह स्टोरी’साठी रोखलेला कॅमेरा बंद करण्याची आर्जव तो करीत होता... त्याच्या त्या नकाराच्या कारणाचा धुंडाळा घेण्याची उत्सुकता मग आपोआपच शिगेला पोचली. तो बोलू लागला... शिक्षण, गाव, घरची परिस्थिती, कामधंद्यासाठी केलेली भटकंती... असं बरंच काही. 

रोजच्या जगण्यातील शापित प्रश्‍नांच्या जंत्रीत भर ती दुष्काळाची. या दुष्काळाच्या झळांनी तो आतून-बाहेरून होरपळतोय खरा; पण हार जणू त्याच्या गावीच नाही. लढणं एवढंच त्याला ठाऊक. त्यामुळेच तर शिक्षणात पदवीपर्यंत मजल मारूनही त्यानं मजूर अड्ड्याशी दोस्ती केलीय.  

त्याचं नाव माउली. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्‍यातील हा तरुण. हलाखीच्या परस्थितीत त्याने २०१६-१७ मध्ये बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेतीत फार काही पिकत नाही. बीएससी झाल्याने पुण्यात चांगली नोकरी मिळेल म्हणून तो पुण्यात आला. नऱ्हेतील एका कंपनीत नोकरी मिळाली; पण पगार तुटपुंजा. अखेरीस नोकरीचा नाद सोडून त्याने सरळ मजूर अड्ड्याची वाट धरली. रोज सकाळी वारजे उड्डाण पुलाखालील अड्ड्यावर तो थांबतो. मिळेल ते काम करून तो चरितार्थ चालवतोय. 

माउली सांगत होता...‘‘माझ शिक्षण चांगलं असल्यानं गावाकडं वाटतंय की, मी मोठ्या कंपनीत नोकरी करतोय. सध्या मिळेल तिथे वॉटर प्रूफिंगचे काम करून पोटपाण्याचा प्रश्‍न सोडवतोय. हे गावी कळलं तर माझी बदनामी होईल.’’...त्यामुळेच त्याने स्वतःचे पूर्ण नाव आणि छायाचित्र छापू नका,  अशी विनंती केली.

आधीच आबाळ, त्यात दुष्काळ!
‘‘आईवडील आणि भावाला घेऊन मी पुण्यात आलो होतो; पण आईवडिलांना जास्त काम होत नसल्याने त्यांना गावी पाठवून दिलं. ते घरच्या शेतात काम करतात. मला आणि भावाला मिळत असलेल्या पैशातून आईवडिलांसाठी आणि शेतीवरील कर्ज फेडण्यासाठी जमेल तेवढे पैसे गावी पाठवतो. गावी पडलेला दुष्काळ आणि कर्जामुळे पडेल ते काम करावंच लागतं.’’ असं माउली सांगतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com