
पदविकाधारक अभियंत्यांना केंद्रीय लोक निर्माण विभागात कामे मिळणार
पुणे - केंद्रीय लोक निर्माण विभागात (सीपीडब्ल्यूडी) स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणी करता येणार असून, ४० लाखांपर्यंतची कामे मिळणार आहेत. यापूर्वी ही सुविधा फक्त पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांनाच उपलब्ध होती.
केंद्रीय लोक निर्माण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणी मिळावी, यासाठी वर्धा कंत्राटदार संघाचे उपाध्यक्ष प्रणव जोशी यांनी पाठपुरावा केला. दिल्ली येथे वेळोवेळी प्रशासनासमोर प्रत्यक्ष बाजू मांडून चर्चा केली. परिणामी केंद्रीय लोक निर्माण विभागाकडून स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना थेट वर्ग-५ मध्ये नोंदणी सुविधा उपलब्ध झाल्याचे पत्र प्राप्त झाले.
वर्धाचे खासदार रामदास तडस आणि भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी वेळोवेळी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून मदत केली. त्यामुळेच हा निर्णय आमच्या बाजूने लागला, अशी प्रतिक्रिया पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी व्यक्त केली. सर्व स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी याचा लाभ घेत केंद्रीय लोक निर्माण विभागात थेट वर्ग-५ श्रेणीत कंत्राटदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन संघटनेचे जोशी आणि भोसले यांनी केले आहे.
Web Title: Graduate Engineers Will Get Jobs In Central Public Works Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..