पदवीप्रदानावेळी आता खादी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

खादीला स्थान देऊ!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या वर्षीच पदवीप्रदान कार्यक्रमाच्या पोशाखात बदल केला आहे. पूर्वीचा ब्रिटिशकालीन गाऊन आता राहिला नसून त्याऐवजी पारंपरिक कुर्ता-पायजमा असा पोशाख आता ठरविण्यात आला आहे. त्याला विरोधही झाला होता. परंतु, हाच पोशाख विद्यापीठाने कायम ठेवला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना खादीच्या वापराबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच पोशाखात बदल केला आहे. यापुढील काळात पोशाख बदलण्याचा निर्णय झाला, तर त्या वेळी खादीला निश्‍चित स्थान देण्यात येईल.’

पुणे - विद्यापीठातील पदवीप्रदानासारख्या विशेष समारंभावेळी खादी वा हातमागाच्या कपड्यांपासून तयार केलेल्या पोशाखांचा वापर करण्याबाबत विचार करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. यासंबंधी आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी पत्रव्यवहार केला आहे.

आयोगाच्या या पत्रामुळे विद्यापीठांमध्ये पदवीप्रदान समारंभाच्या वेळी वापरणारा ब्रिटिशकालीन पारंपरिक गाऊनचा वापर रोखला जाण्याची चिन्हे आहेत. देशातील बहुतांश विद्यापीठांमध्ये पदवी घेताना विद्यार्थी अजूनही हा गाऊन आणि कॅप घालतात. जैन यांनी पत्रात म्हटले आहे, की खादी आणि हातमागाचे कापड हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

पंतप्रधानांनीदेखील त्याला महत्त्व दिले आहे. तसेच, हातमाग हे ग्रामीण भागातील लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधनही आहे. त्यामुळे पदवीप्रदान समारंभावेळी त्या कापडाचा वापर करावा. 

विद्यापीठांनी तर हा विचार करावाच; पण संलग्न महाविद्यालयांच्याही ही बाब लक्षात आणून द्यावी. खादी किंवा हातमागाच्या कापडाचा वापर हा केवळ भारतीय होण्याचा गौरव मिळवून देणार नाही, तर गरम आणि दमट हवामानात आरामदायीदेखील असेल. याशिवाय, सूतकताई करणारे किंवा विणकर यांनाही त्यातून प्रोत्साहन मिळेल, असे जैन यांनी सूचित केले आहे. यामुळे विद्यापीठांना पदवीप्रदानावेळी वापरल्या जाणाऱ्या पोशाखांमध्ये बदल करण्याचा निर्णय करावा लागण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduation Degree Provided Khadi Dress University