‘गृहनिर्माण’च्या तक्रारी महासंघ सोडविणार - विद्याधर अनास्कर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

‘‘सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सहकार खात्याऐवजी गृहनिर्माण महासंघावर जबाबदारी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास सहकार खात्यातील अधिकाऱ्यांकडील ९० टक्के काम कमी होण्यास मदत होणार आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रविवारी दिली. सहकारामध्ये केवळ गृहनिर्माण संस्था हे एकच क्षेत्र राजकारणापासून अद्याप दूर राहिल्याची टिप्पणी त्यांनी या वेळी केली.

पुणे - ‘‘सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सहकार खात्याऐवजी गृहनिर्माण महासंघावर जबाबदारी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास सहकार खात्यातील अधिकाऱ्यांकडील ९० टक्के काम कमी होण्यास मदत होणार आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रविवारी दिली. सहकारामध्ये केवळ गृहनिर्माण संस्था हे एकच क्षेत्र राजकारणापासून अद्याप दूर राहिल्याची टिप्पणी त्यांनी या वेळी केली.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनास्कर बोलत होते. या वेळी महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सचिव मनीषा कोष्टी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अनास्कर म्हणाले, ‘‘सर्वच सहकारी संस्थांना उद्‌भवणाऱ्या समस्यांबाबत अथवा त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सहकार खात्याकडे जावे लागते. अनेकदा त्यासाठी उपनिबंधक कार्यालयात चकरा माराव्या लागतात. सहकार क्षेत्राची सर्वच जबाबदारी सहकार खात्यावर असल्याने गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींना अनेकदा पुरेसा वेळ देता येत नाही. त्याऐवजी गृहनिर्माण महासंघाला तक्रारींचे स्वरूप माहीत असते आणि त्यावर तोडगा कसा काढायचा याची कल्पनादेखील असते, त्यामुळे तक्रारींच्या निराकरणासाठी महासंघाला जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या गरजा आणि अडचणी स्वतंत्र असल्याने त्यांनी आदर्श उपविधींवर अवलंबून न राहता त्यांच्यासाठी वेगळे उपविधी तयार करून घ्यावेत.’’ गृहनिर्माण महासंघाचे माजी संचालक डी. आर. कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहकार क्षेत्रातील वार्तांकनाबद्दलचे पुरस्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grahnirman Complaing Sole by Mahasangh Vidyadhar Anaskar