Gram Panchayat election : पुणे जिल्ह्यातील १६७ गावांच्या सरपंच निवडीसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat election Voting today election of sarpanch of 167 villages of Pune

Gram Panchayat election : पुणे जिल्ह्यातील १६७ गावांच्या सरपंच निवडीसाठी आज मतदान

पुणे : पुणे जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेल्या एकूण २२१ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य आणि ४९ गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी येत्या रविवारी (ता.१८) मतदान घेण्यात येणार आहे. यानुसार १७६ ग्रामपंचायतींच्या सर्वच्या सर्व सदस्यांसाठी, १८ ग्रामपंचायतींच्या अंशतः जागांसाठी आणि १६७ गावांचे सरपंच निवडीसाठी हे मतदान होणार आहे.

दरम्यान, मतदान अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी (ता.१७) सायंकाळीच निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार आहे. ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे. निवडणूक आयोगाने आक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला होता. यामध्ये राज्यातील सात हजार ७७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित १२ तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ ग्रामपंचायती या भोर तालुक्यातील आहेत. या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा समावेश नाही. उर्वरित ११ तालुक्यांपैकी भोरपाठोपाठ वेल्हे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

रविवारी मतदान होत असलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये घोडेगाव, चांडोली बुद्रूक, कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी (सर्व ता. आंबेगाव), लोणी भापकर, मोरगाव, पणदरे, वागजवाडी (ता. बारामती), हर्णस, कर्नाव़ड , कारी, शिरवली तर्फे भोर, वेळवंड, हातनोशी, साळुंगण (ता. भोर), दापोडी, बोरीभडक, दहिटणे (ता. दौंड), पिंपरी सांडस, कदमवाकवस्ती, पेरणे, आव्हाळवाडी, गोगलवाडी (ता. हवेली), मदनवाडी, लाखेवाडी, डाळज नं. २, बिजवडी, कळशी, कुरवली, रेडणी, सराटी (ता. इंदापूर), साकोरी तर्फे बेल्हे, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर), चास, बहुळ, मांजरेवाडी, शिरोली, शेलगाव (ता. खेड), वरसोली, गोडुंब्रे, शिरगाव (ता. मावळ), आडमाळ, मोसे खुर्द, पाथरशेत, कोंढूर (ता.मुळशी), मांडवगण फराटा, करंजावणे (ता. शिरूर) आणि दापोडे, धानेप, कोशिमघर, शिरकोली, वाजेघर बुद्रूक (ता. वेल्हे) आदींचा समावेश आहे.

पहिल्यांदाच मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती

- सोंडे हिरोजी, सोंडे कार्ला (ता. वेल्हे)

- विठ्ठलवाडी, झापवाडी (ता. जुन्नर)

निवडणूक होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

- भोर - ५४

- वेल्हे - २८

- दौंड - ०८

- बारामती -१३

- इंदापूर - २६

- जुन्नर - १७

- आंबेगाव - २१

- खेड - २३

- शिरूर - ०४

- मावळ - ०९

- मुळशी -११

- हवेली - ०७