खरंखुरं वाटणारं पुतळ्यांचं गाव (व्हिडिओ)

ग्रामसंस्कृती उद्यान (पाषाण) - बायोस्कोपमधून चित्रपट पाहण्यात रंगलेली ही मुलं म्हणजे हुबेहूब दिसणारे पुतळे आहेत, हे खरं वाटत नाही ना ?
ग्रामसंस्कृती उद्यान (पाषाण) - बायोस्कोपमधून चित्रपट पाहण्यात रंगलेली ही मुलं म्हणजे हुबेहूब दिसणारे पुतळे आहेत, हे खरं वाटत नाही ना ?

पुणे - खेडेगावातील मोकळ्या जागेत विटी-दांडू खेळणारी मुलं, लंगडी खेळणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावरील हसू, मैदानात रंगलेली कुस्ती... असं जल्लोषपूर्ण वातावरण त्या ठिकाणी कायम असतं. हे गाव वसलं आहे पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील ग्रामसंस्कृती उद्यानात. गजबजलेल्या या गावात गेल्यावर तिथून आपला पाय निघत नाही.

ते खेडेगाव खरं नाही; पण अगदी खरं वाटतं. तिथं मिठाईचं एक दुकानही आहे. खरेखुरे वाटणारे लाडू, बर्फी, बालूशाही, पेढे पाहून आपल्याला तो खाऊ विकत घ्यायचा मोह आवरत नाही. धनगरदादा मेंढ्यांचा कळप घेऊन निघालेले आहेत. शेतकरीदादा शेतीत राबत आहेत. कुंभारदादांकडे फिरत्या चाकावर मातीची भांडी घडवली जात आहेत. बुरुडदादांकडे शाळकरी वयाचे भाऊ-बहीण बांबू चिरून देत आहेत. एके ठिकाणी कीर्तन चाललं आहे. दुसऱ्या ठिकाणी वैद्यबुवा रुग्णावर उपचार करत आहेत. हे सगळं या गावात बघायला मिळतं. 

बाजार भरलेला. तिथं मातीच्या खेळण्यांच्या दुकानाकडे मुलांचं पटकन लक्ष जातं. पाटीलबुवांच्या घराची प्रतिकृती इतकी खरी वाटते की, तिथल्या झोपाळ्यावर जाऊन बसायची इच्छा होते. या घरात आपण आत गेल्यावर एका बाजूला पाळण्यात बाळाला झोपवणाऱ्या काकू दिसतात. दुसऱ्या बाजूला गुरं बांधलेली. इथून जरा खाली उतरून गेलं की, भला मोठा गोठा. त्यात म्हशी दिसतात. त्यांच्यासमोर चारा घालण्यासाठीची व्यवस्था दिसते. 

दसरा सण साजरा करताना राम, लक्ष्मणाच्या वेशातील कलावंत दिसतात. मंदिर, चावडी, झाडाचा पार, शहरातून आलेलं कुटुंब, त्यांपैकी मुलाच्या हातात क्रिकेटची बॅट अशा वातावरणात आपण हरवून जातो. रानात वाघ, सिंह, जिराफ, माकडं, हरिणं, गेंडे, पाणघोडे पाहताना वेळेचं भान राहत नाही. असं हे गाव तिथल्या संस्कृतीची तोंडओळख आपल्याला करून देतं. तिथल्या माणसांचं कष्टांचं जगणं यातून कळतं. तिथल्या निसर्गाचा हवाहवासा सहवास आपल्याला ‘गावाकडे चला,’ असं सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com