ग्रामसेवकांच्या आंदोलनाने ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

- ग्रामसेवकांचे विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून काम बंद
- मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काम ठप्प
- पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करण्याची मागणी

वडगाव मावळ (पुणे) : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी गुरुवारपासून (22 ऑगस्ट) काम बंद आंदोलन सुरू केल्याने मावळ तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. 

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे. ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता सरकारी निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, यासह अनेक मागण्यासाठी मावळातील ग्रामसेवकांनी नऊ ऑगष्टपासून असहकार आंदोलन पुकारले होते व दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

मावळ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे व विस्तार अधिकारी महादेव कांबळे यांची भेट घेऊन दप्तराच्या कपाटाच्या चाव्या व शिक्के त्यांच्याकडे सुपूर्द केले. 

तालुक्‍यात 103 ग्रामपंचायती असून, 76 ग्रामसेवक संपात सहभागी झाल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. संपामुळे विविध दाखले तसेच उतारे न मिळाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर विकासकामे ठप्प होणार आहेत. परंतु ग्रामसेवकांच्या संपामुळे आचारसंहितेच्या अगोदरच विकास कामांवर परिणाम होणार आहे. या पुढील काळात राज्य संघटनेच्या आदेशानुसार आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याची माहिती मावळ तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद ढोले व सचिव कैलास खेसे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gramsevak's agitation for various demands