शेतीमाल वाहतुकीसाठी अनुदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - ईशान्य-पूर्वेकडील राज्य, जम्मू काश्‍मीर या राज्यांत शेतीमालाची हवाई वाहतूक करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने वाहतूक अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना सुरवातीला सहा महिन्यांसाठी राबविली जाणार असून, साधारणपणे 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 

पुणे - ईशान्य-पूर्वेकडील राज्य, जम्मू काश्‍मीर या राज्यांत शेतीमालाची हवाई वाहतूक करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने वाहतूक अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना सुरवातीला सहा महिन्यांसाठी राबविली जाणार असून, साधारणपणे 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 

राज्यात उत्पादित होणारी फळे, भाजीपाला ईशान्य-पूर्वेकडील राज्ये आणि जम्मू काश्‍मीर या राज्यात पाठविला जातो. यामध्ये प्रामुख्याने कांदा, आंबा, द्राक्षे, डाळिंब आणि काही भाजीपाल्याचा समावेश आहे. हा शेतीमाल अतिनाशवंत या प्रकारात येतो. सध्या या शेतीमालाची वाहतूक रस्ते किंवा रेल्वे मार्गाने केली जाते. दीर्घ अंतरामुळे वाहतुकीसाठी जास्त कालावधी लागतो. याचा परिणाम शेतीमालाच्या दर्जावर होतो. यामुळे हवाई मार्गाने शेतीमालाची वाहतूक करण्याचा विचार पुढे येत होता. परंतु, रस्ते, रेल्वे वाहतूक आणि हवाई मार्गाने होणाऱ्या वाहतूक खर्चात मोठी तफावत आढळून येते. राज्यात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला परराज्यांतील बाजारपेठ मिळावी आणि व्यापार वाढीस लागावा याकरिता पणन मंडळाने अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी हवाई मार्गाने होणाऱ्या वाहतूक खर्चास अनुदान देण्यासाठी विशेष योजना राबविली जाईल. ही योजना मिझोराम, आसाम, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर ही ईशान्य पूर्वेकडील राज्ये आणि जम्मू काश्‍मीरमधील हवाई वाहतुकीसाठी लागू आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्या सदस्यांकडून संकलित केलेला शेतीमाल एकत्रित करून या राज्यात पाठवतील. 

असे आहेत निकष 
योजनेचे अनुदान मिळण्यासाठी पणन मंडळाची मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. 
योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. 
किमान 22 मेट्रिक टन माल पाठविणे आणि तेवढाच माल येथे आणला तर व्यवहार्य ठरू शकते. 
प्रवासी वाहतुकीला अनुदान दिले जाणार नाही. 
एका कंपनीस सहा महिन्यांत जास्तीत जास्त 50 लाख रुपये अनुदान 

Web Title: Grant for Agricultural Transport