इंदापूर, बारामती तालुक्‍यांतील द्राक्षांना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

भवानीनगर/ वालचंदनगर - आंध्र प्रदेशातील ‘वरदा’ वादळाचा परिणाम आज काढणीच्या टप्प्यात असलेल्या द्राक्ष बागांवरही जाणवला. या बागांचे अद्याप नुकसानाचे आकडे हाती आले नाहीत. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी बारामती व इंदापूर तालुक्‍यांतील द्राक्ष बागायतदारांना जवळपास दीड कोटीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

भवानीनगर/ वालचंदनगर - आंध्र प्रदेशातील ‘वरदा’ वादळाचा परिणाम आज काढणीच्या टप्प्यात असलेल्या द्राक्ष बागांवरही जाणवला. या बागांचे अद्याप नुकसानाचे आकडे हाती आले नाहीत. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी बारामती व इंदापूर तालुक्‍यांतील द्राक्ष बागायतदारांना जवळपास दीड कोटीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील बोरी, अंथुर्णे परिसरात मंगळवारी (ता. १३) रात्रीच आभाळाने द्राक्ष उत्पादकांच्या मनात धडकी भरवली. आज (बुधवारी) सकाळी पावसाची भुरभुर सुरू झाल्यानंतर काढणीच्या टप्प्यात असलेल्या व दराची निश्‍चिती झालेल्या द्राक्ष बागांमध्ये उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. इंदापूर व बारामती तालुक्‍यांत मिळून पाच हजार एकरांवरील बागांपैकी अगाप हंगामातील काढणीच्या टप्प्यात असलेल्या व फुलोऱ्याच्या स्थितीत असलेल्या जवळपास तीन हजार एकर बागांवर या पावसाचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बारामती तालुका फलोत्पादक संघाचे उपाध्यक्ष भारत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तालुक्‍यांत मिळून अगाप हंगामाच्या बागांना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अद्याप या बागांमध्ये कोणतीही नुकसानाची माहिती मिळालेली नाही. मात्र या ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसांत याचे परिणाम जाणवण्याची शक्‍यता शिंदे यांनी व्यक्त केली. दरम्यान, द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साधारणतः एकरी पाच हजारांपर्यंत प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले नाही, तरी साधारणतः या दोन तालुक्‍यांत अंदाजे दीड कोटीच्या खर्चाची औषधे फवारावी लागतील, असा अंदाज द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केला. दरम्यान, इंदापूर व बारामती तालुक्‍यांत गव्हाच्या पेरण्या झालेल्या असून, अवकाळी पावसामुळे गव्हावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हातातोंडाशी आलेले पीक धोक्‍यात
निमगाव केतकी - पावसाच्या हलक्‍या सरीने आज (बुधवारी) द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले. पंचक्रोशीतील बहुतांश बागा तोडणीला आल्या आहेत. नोटाबंदीनंतर सर्वच शेतीमालाचे दर पडले असताना फक्त द्राक्षाला चांगले दर आहेत. मात्र आता हातातोंडाशी आलेले हे पीकसुद्धा या अवकाळी पावसामुळे धोक्‍यात आले आहे.

आज सकाळपासून ढगाळ हवामान होते. रिमझिम सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत पडत होता. येथील शिवाजी नारायण म्हेत्रे म्हणाले की, मोठ्या कष्टाने व पाच लाख रुपये खर्च करून यंदा बाग आणली आहे. अवघ्या चार- पाच दिवसांत ती तोडणीला आली आहे. सध्या दीडशे रुपयांपर्यंत किलोला भाव आहे. दोन एकरांत वीस टन माल आहे. आजच्या पावसाने किती नुकसान झाले हे दोन दिवसांत कळेल. शेळगाव येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक मोहन दुधाळ म्हणाले की, सध्या ‘शरद’ व ‘जम्बो’ या बागा तोडणीस आल्या आहेत. द्राक्ष परिपक्व अवस्थेत असल्याने थोड्या पावसाने ही मोठे नुकसान होते. आज पाऊस झाला. परंतु, त्या नंतर ऊन पडले नाही, त्यामुळे क्रॅक्रींगचा धोका कमी राहील. मात्र दोन दिवसांत आणखी पाऊस झाला, तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहणार नाही.

Web Title: grapes loss in indapur, baramati