पोषक वातावरणाने वाढली द्राक्षाची गोडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - थंडी आणि पाठोपाठ उन्हाचा चटका वाढल्याने द्राक्ष उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पोषक वातावरणामुळे द्राक्षांची गोडीदेखील वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने द्राक्षांच्या दरात घट झाली आहे. दर आवाक्‍यात आल्याने पुणेकरांना द्राक्षांची चव चाखता येणार आहे. 

पुणे - थंडी आणि पाठोपाठ उन्हाचा चटका वाढल्याने द्राक्ष उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पोषक वातावरणामुळे द्राक्षांची गोडीदेखील वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने द्राक्षांच्या दरात घट झाली आहे. दर आवाक्‍यात आल्याने पुणेकरांना द्राक्षांची चव चाखता येणार आहे. 

मार्केट यार्डातील फळ विभागात रोज ६० ते ६५ टन द्राक्षांची आवक होत आहे. हिरव्या द्राक्षाच्या १५ किलोला ३५० ते १०००, तर काळ्या द्राक्षाला १० किलोला ३५० ते ८५० रुपये दर मिळत आहे. ही आवक सांगली, सातारा, पुणे, नाशिक, निफाड आणि सोलापूर येथून होत आहे. हिरव्या द्राक्षांत हलक्‍या प्रतीचा माल अधिक आहे, तर काळ्या द्राक्षांत चांगल्या प्रतीचा माल अधिक आहे. येत्या काळात घाऊक बाजारातील द्राक्षाची आवक १०० टनांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला. 

सद्य:स्थितीत बाजारात थॉमसन, माणिक चमण, सोनाका, सुपर सोनाका, जम्बो, कृष्णा, सरिता, शरद आदी प्रकारच्या द्राक्षांची आवक होत आहे. आवक वाढल्यानंतर दरात आणखी घट होण्याची शक्‍यता आहे. किरकोळ बाजारात किलोचा दर ५० ते ७० रुपये आहे. डिसेंबरपासून द्राक्षाची आवक सुरू झाली आहे. ही आवक एप्रिलपर्यंत असणार आहे. मागील वर्षी द्राक्षाला पोषक हवामान नव्हते, त्यामुळे उत्पादन कमी होते. त्यामुळे हलक्‍या प्रतीच्या मालालाही दर मिळाला होता. यंदा मात्र चांगल्या प्रतीच्या मालाचे दरही आवक वाढल्याने आवाक्‍यात आले आहेत. यंदा बागेतून खरेदी करण्याचे प्रमाणही वाढल्याचे मोरे यांनी सांगितले.

परराज्यांतून मागणी वाढली
पोषक हवामानामुळे द्राक्षाचा दर्जा चांगला आहे, त्यामुळे राज्याप्रमाणेच परराज्यांतूनही द्राक्षाला मागणी वाढली आहे. सांगली, सातारा येथील द्राक्षाला केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू येथून मागणी होत आहे; तर पुणे, नाशिक येथील द्राक्षाला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि गुजरात या राज्यांतून मागणी होत आहे. परराज्यातही द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Grapes Rate Environment