हमाली करणाऱ्या सासरे जावयांने कष्टाने शेती केली हिरवीगार

takve-budruk
takve-budruk

टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी हापसून वर आले नाही. तरीही हताश किंवा नाराज न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरे जावयांने साडेतीन किलोमीटरवरून शेतीला पाणी आणून शिवार हिरवेगार केले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर पायथा.डाहूलीतील गबाजी पिंगळे सासरे आणि बेंदेवाडीतील गणपत डेनकर जावाई. त्यांनी शिवारात पाणी आणून समूह शेतीला सुरूवात केली.

६५ एकर शेतीत ई रजिक पद्धतीने शेती केली जात आहे. यासाठी पाच सरकत्यांची दहा माणसे रात्रंदिवस राबत आहे. त्यांच्या घामाचे आणि श्रमाचे चीज झाले या उत्साहाने ते काळ्या आईची सेवा करायला कष्ट करीत आहेत. येथे कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांचे हात राबत आहे. 

त्यांच्या शेतात गहू, बटाटा, कांदा, लसूण, कोथिंबीर, मेथी, मुळा, वांगी, काळाघेवडा, पावटा, राजमा अशी पिके बहरली आहे. आज हिरवीगार शेती असली तरी कालपरवा खडकाची, मुरबाड नापीक अशी जमीन होती. पावसाळ्यात येथे उगवलेल्या गवतावर गुरे दिवसभर चरत नव्हती. सासरे जावयाने पंचवीस वर्षे मुंबईच्या दादर आणि ठाणे फलाटावर हमाली करीत होते. फलाटातून डोक्या खांद्यावर घेतलेला बोझा वाहताना शिवारातील पडीक जमीन डोळ्यापुढे तरळायची. या खडकाळ जमीनीवर हिरवे शिवार फुलवायचे स्वप्न त्यांनी पाहिली ती स्वप्ने पूर्णत्वाला गेली. 

शेताला पाणी पाहिजे म्हणून १९९९ ला पहिली आणि २००२ ला दुसरी विहीर खोदली पण विहिरीला पाझर फुटला नाही. दोन वर्षांपूर्वी हातपंपासाठी बोअरवेल लावला पण त्याने धोका दिला. हमालीच्या व्यवसायातील उत्पन्न घटले.पुढे काय हा प्रश्न होता बागायती शेती करायची या निर्धारानेपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खांडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे शेती कर्ज, पिक कर्ज, मध्य मुदत कर्ज काढून खडकाळ जमीनीवर जेसीबी व टॅक्सीच्या मदतीने खाचरे पाडली. ठोकळवाडी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाणी परवाना काढून दहा एचपीची मोटार बसवून पाणी उचलले. धरणातून शेतीला पाणी आणायचे म्हणजे नुसती चढण चढवून पाणी आणायचे. तेही आवाहन त्यांनी स्वीकारून पाणी आणले. शेतीची डेव्हलपमेंट, मोटार, पाईपलाईन, मंजूरी साठी तेरा लाख रुपये खर्च आला. पण दोघांचे मिळवून ६५ एकर जमीन ओलिताखाली आली. 

सोमनाथ पिंगळे, पंढरीनाथ पिंगळे, दिलीप पिंगळे यांना सोबत घेऊन ते समूह शेती करीत आहेत. हिराबाई पिंगळे, मीरा पिंगळे, सहिंद्रा पिंगळे, संगीता पिंगळे, आशा डेनकर या महिला शेतात राबत आहे. मावळात जमिनींना सोन्याचा भाव आहे. खडकाळ पडीक जमीन शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने विकल्या आहे.पिंगळे व डेनकर यांच्या सारखे अपवादात्मक शेतकरी ज्यांनी खडकाळ माळरानावर हिरवी शेती फुलवली. येथे त्यांना शेतीपूरक व्यवसायांसह कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचे आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com