मटारची शंभरी पार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पुणे : दुष्काळ, पाणी टंचाईचा फटका मटार उत्पादनाला बसला आहे. उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्केट यार्डातील तरकारी विभागात निम्मीच आवक होत आहे.त्यामुळे मटारचे भाव तेजीत असून, किरकोळ बाजारात मटारला दर्जानुसार प्रतिकिलो 130 रुपये भाव मिळत आहे. 

बाजारात रविवारपासून (ता.११)  मटारची आवक सुरू झाली. रविवारी पाच ते सहा गाड्या आणि सोमवारी दोन गाड्या आवक झाली आहे. सप्टेंबरपर्यंत या मटारचा हंगाम सुरू राहणार असल्याचे व्यापारी आणि अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले, यावर्षी नेहमीच्या तुलनेत कमीच आवक होणार आहे. मागील वर्षी हंगामाच्या सुरवातीला 15 ते 16 गाड्या आवक होत होती. ती यावर्षी पहिल्या दोन दिवसांत मिळून 7 ते 8 गाड्या झाली आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालापैकी केवळ 30 टक्के माल दर्जेदार आहे.
चवीला गोड असलेल्या पुरंदर, पारनेर मटारची नागरिक दरवर्षी आवर्जून वाट पाहत असतात. सध्या घाऊक बाजारात या मटारला दर्जानुसार प्रती किलोस 50 ते 70 रुपये भाव मिळत आहे. दुसरीकडे कर्नाटकातून मटारची आवक सुरू आहे. रविवारी बेळगाव, धारवाड भागातून 2 गाड्यांची आवक झाली होती. त्यास घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 40 ते 50 रुपये भाव मिळत आहे.
पुराचा फटका कर्नाटकातही बसला आहे. तेथून होणारी आवक काही दिवसांतच बंद होणार असल्याची शक्‍यताही भुजबळ यांनी वर्तविली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green peas price increased