पुणे-दौंड लोहमार्गावरील लोकलचा मार्ग मोकळा होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे-दौंड लोहमार्गावरील मांजरी, कडेठाण व खुटबाव या स्टेशनच्या विकासासाठी अर्थसंकल्पात सात कोटी 35 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील "इमू'द्वारे (इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट) लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

पुणे - पुणे-दौंड लोहमार्गावरील मांजरी, कडेठाण व खुटबाव या स्टेशनच्या विकासासाठी अर्थसंकल्पात सात कोटी 35 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील "इमू'द्वारे (इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट) लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, या मार्गावरील मांजरी, कडेठाण व खुटबाव या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची खूप कमी असल्याने आणि काही ठिकाणी प्रवाशांसाठी उड्डाण पूल नसल्याने "इमू'द्वारे लोकल सेवा देताना अडथळे येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊनही या मार्गावर लोकल धावू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात या तिन्ही स्टेशनच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मच्या उंचीसह पादचारी उड्डाण पूलही उभारण्यात येणार आहेत.

पुणे यार्ड नूतनीकरण आणि हडपसरला नवीन सॅटेलाइट टर्मिनल उभारण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या दोन्ही कामांना गेल्या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात मान्यता दिली होती. याबरोबरच कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी 200 कोटी, कराड-चिपळूण मार्गासाठी 300 कोटी रुपये आणि नगर-बीड मार्गासाठी 270 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय पुणे-लोणावळा, पुणे-दौंड आणि पुणे-मिरज मार्गावर ट्रॅक सुरक्षा आणि दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपये, पुणे-मिरज मार्गावर भिलवडी स्टेशन येथे दोन पादचारी उड्डाण पूल उभारण्यास मंजुरी, पुणे-नाशिक रेल्वेसाठी 25 कोटी रुपये आणि बारामती-लोणंद नवीन लाइनसाठी 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Green signal for Pune-Daund Local route