ग्रीटिंग विकून सजविले बसथांबे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे - हल्ली राजकीय पक्षांमधून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात किती काम होते याबद्दल सुज्ञ पुणेकरांना सांगण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, हीच सामाजिक कार्याची ऊर्मी अनेकांना प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन प्रेरित करते. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या परराज्यांतील विद्यार्थ्यांना शहरातील विद्रूप झालेले पीएमपी बसथांबे खुणावत होते. त्यांना स्वच्छ करून ते सुशोभित करण्याचा विडा त्यांना उचलला. तसेच ग्रीटिंग कार्ड तयार करून त्यातून जमा झालेली रक्कम सुशोभीकरणासाठी वापरली. ‘शाब्बास! हेच खरे पुणेकर’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पुणे - हल्ली राजकीय पक्षांमधून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात किती काम होते याबद्दल सुज्ञ पुणेकरांना सांगण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, हीच सामाजिक कार्याची ऊर्मी अनेकांना प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन प्रेरित करते. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या परराज्यांतील विद्यार्थ्यांना शहरातील विद्रूप झालेले पीएमपी बसथांबे खुणावत होते. त्यांना स्वच्छ करून ते सुशोभित करण्याचा विडा त्यांना उचलला. तसेच ग्रीटिंग कार्ड तयार करून त्यातून जमा झालेली रक्कम सुशोभीकरणासाठी वापरली. ‘शाब्बास! हेच खरे पुणेकर’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या मोहिमेत सहकार्य करण्यासाठी त्यांना अनेक अज्ञात हात पुढे आले अन्‌ त्यांचे बळ वाढले.

जेसी राशेल (केरळ), हर्षराजकुमारी सिंह (राजस्थान), विभा भट (जम्मू काश्‍मीर), मनन कट्याल (दिल्ली), प्रतीम कोटेआ (बंगळूर) हेच खरे पुणेकर. सध्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालयात शिकत आहेत. संप्रती ही संघटना बंगळूर, हैदराबाद, नागपूरमध्ये कार्यरत आहे. तेथे त्यांनी बसथांब्यांच्या सुशोभीकरणाचा प्रयोग केला होता. याची माहिती मिळाल्यावर कॉलेज सांभाळून आपणही हा उपक्रम करावा, असे त्यांना वाटले. यासाठी त्यांनी पहिल्यांदा कॉलेजकडून आणि पीएमपीकडून परवानगी घेतली.

त्यानुसार सेनापती बापट रस्त्यावरील सन्नी हाउस, विमाननगरमधील कैलास सुपर मार्केट व म्हाडा कॉलनी बसथांब्यांची त्यांनी केवळ स्वच्छता केली नाही, तर आकर्षक रंगसंगतीद्वारे सुशोभीकरणही केले. पीएमपीच्या बसगाड्यांचे वेळापत्रक, हेल्पलाइनचा तपशील पीएमपीचे संकेतस्थळ आणि ॲपवरून मिळविला. स्वच्छता करणे सोपे होते. मात्र, सुशोभीकरणासाठी सुशोभीकरणासाठीचा खर्च भागविण्यासाठी त्यांच्यापुढे पैशांचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातूनच त्यांनी ग्रीटिंग कार्ड तयार करण्याचे ठरविले. त्याची विविध कॅफेंमध्ये विक्री केली. त्यातून सुमारे ४० हजार रुपये जमा झाले. कार्ड विकत घेण्याचे कारण समजल्यावर ते खरेदीदारांनीही त्यांचे कौतुक करून सहकार्याचा हात पुढे केला. एक बस थांबा स्वच्छ करण्यासाठी त्यांना चार दिवस लागले. 

या अनुभवाबाबत जेसी म्हणाली, ‘‘सुट्यांमध्ये आम्ही यावर काम सुरू केले. आमच्या कॉलेजनेही आम्हाला त्यासाठी मोलाची मदत केली. यासाठी इन्स्टाग्रामवर sampratiorg या नावाने अकाउंट उघडले आहे. पुढच्या टप्प्यात आणखी काही बसथांब्यांसाठी आम्हाला काम करायचे आहे.

त्यासाठी काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीची गरज आहे. त्यांच्या मदतीने आम्ही बस थांबे स्वच्छ करून मराठी भाषेत पीएमपीच्या सूचना लिहिणार आहोत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी इन्स्टाग्रामवर आमच्याशी संपर्क साधला तर, त्यांनाही या उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊ.’

Web Title: Greeting Sailing Decorate Busstop Motivation