‘इलेक्‍ट्रिक कार’ सेवेत ‘झूमकार’चे पदार्पण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

शेअरिंग व मोबिलिटी कंपनी असलेल्या झूमकारची ओळख मोठ्या शहरांतील लोकांना झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील कंपनीची वाटचाल आणि भविष्यातील उपक्रमांसंदर्भात सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरन यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद.

प्रश्‍न - ‘झूमकार’ हे स्टार्टअप केव्हा सुरू झाले?
ग्रेग मोरन - मी आणि माझा मित्र डेव्हिड बॅकने २०१२ डिसेंबरमध्ये पेनसिल्वानिया विश्‍वविद्यापीठामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बंगळूर येथे ‘झूमकार’ स्टार्टअप २०१४मध्ये सुरू केले. कार भाड्याने घेताना मला खूप अडचणी आल्या, आर्थिक फसवणूकही झाली. मात्र, या व्यवसायामध्ये मोठी बाजारपेठ आणि क्षमता असल्याचे दिसून आले. देशी व परदेशी व्यक्तींना प्रवासासाठी कार भाड्याने घेण्यासाठी ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ म्हणून ‘झूमकार’ स्टार्टअप सुरू केले.

‘झूमकार’ची वाटचाल कशी झाली? निधी कसा उभा केला?
भारतीय व्यक्तींना स्वतःच्या मालकीची कार घेण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव आणि आर्थिक अडचण असल्यामुळे गरजेपुरती कार भाड्याने घेण्याकडे लोकांचा कल असल्यामुळे ‘झूमकार’ यशस्वी होईल, असा मला विश्‍वास होता. परंतु, स्टार्टअप सुरू केल्यानंतर निधी मिळविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. सुरवातीच्या अपयशातून आलेल्या नैराश्‍यामुळे मी सर्व बंद करून माझ्या घरी जाणार होतो, परंतु काही लोकांनी आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर ‘झूमकार’ची आर्थिक गुंतवणूक आता ४.५ कोटी डॉलर झाली आहे. 

कंपनी सध्या कोणकोणत्या राज्यांमध्ये सुरू आहे?
‘झूमकार’च्या अखत्यारीत सध्या देशातील २६ शहरांमध्ये सुमारे ३ हजार कार धावत आहेत. सध्या महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, फोर्ड, टाटा मोटर्स यांच्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. ‘सेक्‍युओईआ कॅपिटल’ कंपनीनेही आर्थिक गुंतवणूक केली आहे. 

 ‘झूमकार’ स्टार्टअपच्या भारतातील भविष्यातील योजना कोणत्या आहेत?
मला भारत आणि चीनबद्दल नेहमीच आकर्षण होते. भारतात मी बॅंकिंग क्षेत्रात काम सुरू केले होते. त्यामुळे येथील गरज लक्षात घेऊन ‘झूमकार’ स्टार्टअप सुरू केले. ते यशस्वी झाले. सध्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कारसेवा पुरविली जात आहे. बससेवा देण्याचाही विचार आहे. महिंद्रा इलेक्‍ट्रीक कंपनीसोबत इलेक्‍ट्रीक कार सेवा ‘सेल्फ ड्राइव्ह आणि झॅप सबस्क्रिप्शन’ सुविधेद्वारे देण्याची योजना सुरू केली आहे. बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, चेन्नईनंतर पुण्यामध्ये इलेक्‍ट्रीक कार सेवा सुरू केली आहे.

Web Title: Greg Moran interview