गटनेतेपदी एकनाथ पवार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचा गटनेता होण्याचा मान टाटा मोटर्सचे कामगार नेते एकनाथ पवार यांना मिळाला आहे. पक्षाच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही निवड आज जाहीर केली. 

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचा गटनेता होण्याचा मान टाटा मोटर्सचे कामगार नेते एकनाथ पवार यांना मिळाला आहे. पक्षाच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही निवड आज जाहीर केली. 

एकनाथ पवार हे प्रभाग क्रमांक 11 (कृष्णानगर- कोयनानगर- अजंठानगर)मधून निवडून आले आहेत. 2007 मध्ये ते भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. पवार यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर चांगली मते घेतली होती. त्यांच्या निवडीमुळे भाजपमधील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे. पवार हे पूर्वीपासून केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. 

नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात ते आले आहेत. महापालिकेतील आणि पक्ष संघटनेतील कामकाजाचा अनुभव पाहून भाजपने पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, पक्षाचे शहराध्यक्ष जगताप यांनी पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. 

भाजपच्या संस्कृतीला शोभेल असेच काम होईल 
"सकाळ'शी बोलताना एकनाथ पवार म्हणाले, ""महापालिका प्रशासन गतिमान करून पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्यावर आमचा भर राहणार आहे. भाजपच्या संस्कृतीला शोभेल असेच काम होईल. आजवर निष्ठेने पक्षाचे काम केले, त्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून आपली गटनेतेपदी निवड केली गेली. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे महापालिकेत सत्तापरिवर्तन घडविण्यात भाजपला मोठे यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढे शहरातील नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शहराला देशातील प्रथम क्रमांकाची "स्मार्ट सिटी' बनविण्यासाठी पदाचा उपयोग करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष आमदार जगताप, आमदार महेश लांडगे या सर्वांचे मी आभार मानतो.'' 

निष्ठावंतांना न्याय... 
महापालिकेत निवडून आलेले 77 आणि पुरस्कृत एक असे 78 पैकी 16 नगरसेवक जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी आहेत. उमेदवारी वाटपापूर्वी फक्त आयात मंडळींना मान दिला जातो, असा सूर डावललेल्यांनी लावला होता. मात्र, एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्याने त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. महापौर, उपमहापौर पदावरसुद्धा भाजपच्या जुन्याच कार्यकर्त्यांपैकी एकाची निवड निश्‍चित असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Group Leader Eknath Pawar