आजी-माजी महापौरांच्या संपत्तीत कोटींनी वाढ 

सलील उरुणकर 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. गेल्या पाच वर्षांत महापौर झालेल्या उमेदवारांच्या मालमत्तेचा हा तपशील 

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गेल्या पाच वर्षांतील चार आजी- माजी महापौरांची संपत्ती काही कोटी रुपयांची आहे. दत्ता धनकवडे यांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य सात कोटी रुपयांवरून 27 कोटी, चंचला कोद्रे यांचे आठ कोटींवरून 14 कोटी, वैशाली बनकर यांचे 81 लाखांवरून अडीच कोटी आणि प्रशांत जगताप यांचे एक कोटीवरून फक्त एक कोटी सोळा लाख एवढे झाले आहे. 

दत्ता धनकवडे 
दत्ता धनकवडे (वय 46) यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये त्यांना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कैद होऊ शकते. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. धनकवडे यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर खात्याकडे भरलेल्या विवरणपत्रानुसार त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 96 लाख 54 हजार रुपये आहे, तर पत्नी विद्या यांचे 6.23 लाख रुपये आहे. धनकवडे यांच्या नावावर रोख रकमेसह बॅंक आणि वित्तीय कंपन्यांमधील ठेवी, कंपन्यांमधील कर्जरोखे, बंधपत्रे, दागिने आणि व्याजाचे मूल्य अशी एकूण 4.32 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये 87.22 लाख रुपयांच्या मोटार वाहनांचा समावेश आहे. तर सदनिका, कृषी जमीन, व्यापारी इमारती अशी एकूण 15.21 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर आहे. तसेच, त्यांच्या नावावर बॅंकांकडून घेतलेले 20.84 लाख रुपयांचे आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले 49.90 लाख रुपयांचे कर्ज आहे. धनकवडे यांच्या नावावर सार्वजनिक वित्तीय व शासकीय संस्थांकडील दायित्व किंवा थकीत रक्कम 97.74 लाख रुपयांची आहे. 

प्रशांत जगताप  
प्रशांत जगताप (वय 38 वर्षे) यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही. जगताप यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर खात्याकडे भरलेल्या विवरणपत्रानुसार त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये आहे. जगताप यांच्या नावावर फक्त 9.29 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये 47 हजारांच्या रोख रकमेसह बॅंक आणि वित्तीय कंपन्यांमधील 2.18 लाखांच्या ठेवी आणि 89 हजारांच्या दागिन्यांचा समावेश आहे. जगताप यांच्या नावावर 99.89 लाख रुपयांची स्थावर मालमत्तेची नोंद आहे. यामध्ये वानवडी येथील कृषी जमीन आणि सदनिकेचा समावेश आहे. तसेच, त्यांच्या नावावर 31 लाख रुपयांचे, तर पत्नी अमृता यांच्या नावे 25 लाख रुपयांचे कर्ज आहे. जगताप यांच्या नावावरील सार्वजनिक वित्तीय व शासकीय संस्थांकडील दायित्व किंवा थकीत रक्कम 56 लाखांची आहे. 

चंचला कोद्रे 
चंचला कोद्रे (वय 41 वर्षे) यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. गृहिणी असलेल्या चंचला यांचे 2015-16 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर खात्याकडे भरलेल्या विवरणपत्रानुसार एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख 20 हजार रुपये आहे. त्यांचे पती संदीप यांचे व्यावसायिक वार्षिक उत्पन्न 11.83 लाख रुपयांचे आहे. चंचला यांच्याकडे रोख 25 हजार रुपये, बॅंक आणि वित्तीय कंपन्यांमधील साडेतीन लाख रुपयांच्या ठेवी, साडेपाच लाख रुपयांचे दागिने अशी एकूण 13.46 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. मात्र, पती संदीप यांच्या नावावर बारामती व मुंढवा येथील कृषी जमीन, एरंडवण्यातील सदनिका आणि व्यापारी इमारत अशी एकूण 12.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. संदीप कोद्रे यांच्या नावावर 16.69 लाख रुपयांचे बॅंकेचे कर्जही आहे. चंचला यांच्या नावावर सार्वजनिक वित्तीय व शासकीय संस्थांकडील दायित्व किंवा थकीत रक्कम 16.69 लाख रुपयांची आहे. 

वैशाली बनकर 
वैशाली बनकर यांचे वय 47 असून, त्यांनी सासवड येथील महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. गृहिणी असलेल्या वैशाली बनकर यांचे 2015-16 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर खात्याकडे भरलेल्या विवरणपत्रानुसार एकूण वार्षिक उत्पन्न 5.77 लाख रुपये आहे. नोकरी करत असलेले त्यांचे पती सुनील यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये आहे. वैशाली यांच्या नावावर 10.72 लाखांच्या, पती सुनील यांच्या नावावर 4.71 लाखांच्या, मुलगा रुशीद याच्या नावावर 5.52 लाखांच्या आणि मुलगी ऋतुजा हिच्या नावावर 1.63 लाख रुपयांच्या बॅंक ठेवी आहेत. वैशाली बनकर यांच्या नावावर 8.40 लाखांच्या दागिन्यांसह एकूण 1.20 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बनकर यांच्या नावावर सार्वजनिक वित्तीय व शासकीय संस्थांकडील दायित्व किंवा थकीत रक्कम पाच लाख रुपयांची आहे. 

एकूण मालमत्ता मूल्य (रुपयांत) 
महापौरपदाचा कालावधी - नाव 2012 निवडणूक 2017 निवडणूक 

(फेब्रुवारी 2016 पासून आजपर्यंत) प्रशांत जगताप 1,05,13,445 1,16,41,931 
(सप्टेंबर 2014 ते फेब्रुवारी 2016) दत्ता धनकवडे 7,01,56,746 27,14,06,138 
(सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2014) चंचला कोद्रे 8,01,48,000 13,97,94,166 
(मार्च 2012 ते सप्टेंबर 2013) वैशाली बनकर 81,62,000 2,58,34,354 

Web Title: Growth crore assets of former Mayor