कोण होणार पालकमंत्री?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांकडे जाण्याचीही शक्‍यता 
मंत्रिपदाबरोबरच पालकमंत्रिपदासाठी शहर-जिल्ह्यात इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हे वाद टाळण्यासाठी शहर- जिल्ह्याबाहेरील एखाद्या विद्यमान मंत्र्यांकडेच ते सोपविण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो. तसेच पुणे, पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्यातून विधानसभेला यश मिळून देण्यासाठी हा पर्याय असल्याचे पक्षश्रेष्ठींचे मत झाले, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या दोघांपैकी एकाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही काळात हे पद शहर- जिल्ह्यात राहणार की विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला मिळणार हे ठरेल.

पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. 

या पदासाठी शहर- जिल्ह्यातील अनेक नेते इच्छुक आहेत. हे हेरून लोकसभा निवडणुकीत याचा योग्य वापर पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप, दौंडचे आमदार राहुल कुल, मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यासह पुणे शहरातील आमदार माधुरी मिसाळ, राज्यमंत्री दिलीप कांबळे या पदासाठी इच्छुक आहेत. 

मंत्र्याकडेच पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाते. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता आहे. बापट यांच्याकडे तीन खात्यांचा कार्यभार आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची खाती कोणाकडे जाणार, शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरेल. शहर अथवा जिल्ह्यातील इच्छुकांना संधी मिळाली, तर पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाईल, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister BJP Politics