Chandrakant Patil : ‘सीसीटीव्ही’द्वारे ऑनलाइन दंडाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 chandrakant Patil

Chandrakant Patil : ‘सीसीटीव्ही’द्वारे ऑनलाइन दंडाची कारवाई

पुणे : ‘‘विविध कारणांमुळे पुण्यात वाहतूक कोंडी होत आहे. कोंडी टाळण्यासाठी पोलिस ठाण्यांकडील पोलिस, गृहरक्षक दल, खासगी वॉर्डन अशा स्वरूपाचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कर्मचाऱ्यांऐवजी सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन दंडाची कारवाई होईल,’’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेबाबत त्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस ते उपस्थित होते. या वेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने, बापू पठारे आदी उपस्थित होते.

समाविष्ट गावांत विकासकामे सुरू केली जातील

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या चौतीस गावांमध्ये बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसन शुल्क घेतले. त्याचा पाचशे कोटी रुपये निधी ‘पीएमआरडीए’कडे आहे. मात्र, त्यातून ‘पीएमआरडीए’ने चौतीस गावांमध्ये कोणतेही विकासकाम सुरू केले नाही. हा विरोधाभास असून, ‘पीएमआरडीए’ने हा निधी दिल्यास, त्यामध्ये महापालिका व नगरविकास खाते आणखी पाचशे कोटी रुपयांची भर घालून समाविष्ट गावांत एक हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली जातील. त्यातून समाविष्ट गावांमधील अनेक नागरी प्रश्न मार्गी लागतील, असेही पाटील यांनी सांगितले.

नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी

राज्यातील पोलिस दलामध्ये लवकरच वीस हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी आठशे पोलिस पुण्यातून भरती केले जाणार आहेत. याबरोबरच पुणे पोलिस दलात वाघोली, खराडी, बाणेर, फुरसुंगी, आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ अशी सात नवीन पोलिस ठाणीही मंजूर झाली आहेत. त्यासाठीच्या आव‍श्यक निधीसाठी राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.