पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

पुणे : महापालिका पदाधिकाऱ्यांपाठोपाठ पालकमंत्री गिरीश बापट यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत महापालिकेतील विभागप्रमुखांची शनिवारी झाडाझडती घेतली. विशेषत: नदीसुधारणा, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वाहतुकीच्या योजनांना वेग का नाही? अशी विचारणा करीत बापट यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. 

पुणे : महापालिका पदाधिकाऱ्यांपाठोपाठ पालकमंत्री गिरीश बापट यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत महापालिकेतील विभागप्रमुखांची शनिवारी झाडाझडती घेतली. विशेषत: नदीसुधारणा, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वाहतुकीच्या योजनांना वेग का नाही? अशी विचारणा करीत बापट यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. 

शहरातील विविध प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी आणि सध्या सुरू असलेल्या कामांच्या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी महापालिकेतील विभागप्रमुख आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, विकासकामांसंदर्भात आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी बापट यांनी शुक्रवारी (ता. 8) चर्चा केली होती. त्या वेळी अधिकारी ऐकत नसल्याने लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे गाऱ्हाणे पदाधिकाऱ्यांनी मांडले होते. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी महत्त्वाच्या विभागांकडील कामांचा आढावा घेतला. पावसाळी आणि आरोग्य खात्याशी संबंधित कामांकडे प्रशासन काणाडोळा करीत असल्याने या विभागप्रमुखांची कानउघाडणी त्यांनी केली. पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लोकांची कामे वेगाने करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. 

पावसाळी कामांकडे दुर्लक्ष 
पावसाळी कामांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरात सर्वत्र पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय झाली. या कामांची माहिती अधिकारी लपवत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळा आला असूनही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यात पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या विभागाच्या प्रमुखांची हजेरी पालकमंत्र्यांनी केली. 

आमदारांच्या नगरसेवकांविरुद्ध तक्रारी 
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवक जुमानत नसल्याचा सूर आमदारांनी व्यक्त केला. यामुळे बापट यांनी नगरसेवकांच्या कामात आमदारांनी मदत करावी, अशी सूचना केली. तसेच, आपापल्या भागातील विकासकामे करीत असताना संबंधित आमदारांना विश्‍वासात घेण्याचे निर्देश नगरसेवकांना बापट यांनी दिल्याचे एका आमदाराने सांगितले. 

Web Title: guardians minister attack on pmc officers