देखणा गुजराती बोकड पळविला; चोराला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

बकरी ईदच्या सणासाठी खास गुजरातहून आणलेला सानियन या उच्चप्रजातीच्या बोकड पळवून नेणाऱ्या बोकड चोर समर्थ पोलिसांनी जाळ्यात अडकला. या बोकड चोराकडून पोलिसांनी 25 हजार रुपयांचा बोकड जप्त करुन त्याच्या मुळ मालकाकडे पुन्हा सुपुर्द केला. 

पुणे : बकरी ईदच्या सणासाठी खास गुजरातहून आणलेला सानियन या उच्चप्रजातीच्या बोकड पळवून नेणाऱ्या बोकड चोर समर्थ पोलिसांनी जाळ्यात अडकला. या बोकड चोराकडून पोलिसांनी 25 हजार रुपयांचा बोकड जप्त करुन त्याच्या मुळ मालकाकडे पुन्हा सुपुर्द केला. 

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण सोमवारी (ता.12) सर्वत्र साजरा करण्यासाठी मुस्लिम कुटुंबीयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. या सणासाठी लागणारे बोकड मागील दोन ते तीन महिन्यांपासूनच खरेदी करण्यास मुस्लिम बांधवांनी प्राधान्य दिले होते. त्याच पद्धतीने यासर काझी (रा.नाना पेठ) यांनी तीन महिन्यापुर्वी भवानी पेठेतील बाजारामध्ये गुजरातहून आणलेला सानियन प्रजातीचा बोकड 25 हजार रुपये देऊन खरेदी केला होता. सणासाठी या बोकडाला काझी यांच्या कुटुंबाकडून चांगले खाद्य दिले जात होते. पांढराशुभ्र सानियन बोकड येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत होता. 

दरम्यान, तफिम बेग (रा.मंगळवार पेठ) हा काही कामानिमित्त नाना पेठेत गेल्यानंतर त्याला काझी यांचा बोकड दिसला. बकरी ईद सणासाठी अवघा एक दिवस राहीला असल्यामुळे बोकडांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे तफिमने दोन दिवसांपुर्वी काझी यांच्या घराजवळ बांधलेला बोकड रात्रीच्यावेळी चोरुन नेला. सण तोंडावर आलेला असताना बोकड चोरीस गेल्यामुळे काझी कुटुंबीय हवालदील झाले होते. दरम्यान, समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शेट्टीबा शिंदे, पोलिस कर्मचारी हेमंत पेरणे व सुभाष मोरे हे तिघेजण नरपतगिरी चौकामध्ये पायी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक तरुण बोकड घेऊन घाईगडबडीमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिंदे यांनी त्यास हटकले. त्याच्याकडे बोकडाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हा बोकड नाना पेठेतून चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी बोकडाचा मालक काझी यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे बोकड सुपुर्द केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarati 'Sanen' goat thief arrested