गुंडांचा पक्ष हीच भाजपची प्रतिमा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पिंपरी - ज्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे अशांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे. यामुळे गुंडांचा पक्ष हीच भाजपची प्रतिमा झाली आहे, अशी परखड टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली. गुंडांच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्‍त केली.

पिंपरी - ज्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे अशांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे. यामुळे गुंडांचा पक्ष हीच भाजपची प्रतिमा झाली आहे, अशी परखड टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली. गुंडांच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्‍त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. १७) पिंपरी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीपासून शहरात राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी जाणीवपूर्वक इतर पक्षांतील नेत्यांना आयात करण्यास सुरवात केली. सध्या कोणालाही भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने भाजप हा गुंडांचा पक्ष, अशी प्रतिमा झाली आहे. इतर पक्षांतून नेते आयात करण्यासाठी त्यांना आमदार, महामंडळाचे आमिष दाखविले जाते. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि आरएसएसवालेही नाराज झाले आहेत. मात्र भाजपची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. ‘आरे’ला ‘कारे’ने उत्तर देऊ. पूर्वी शहरात गाववाला आणि बाहेरचा असा वाद होता. मात्र आता तो राहिलेला नाही.’’

आघाडीचा फॉर्म्युला जुनाच
ज्या ठिकाणी पक्षाचा नगरसेवक आहे ती जागा त्याला. मात्र ज्या ठिकाणी इतर पक्षातून नगरसेवक ज्या पक्षात आला ती जागाही त्यालाच दिली जाणार आहे. याशिवाय मागील निवडणुकीत जो पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असेल ती जागा त्या पक्षाला, असा जागा वाटपाचा फॉम्युला आहे. काँग्रेससोबत सन्मानपूर्वक आघाडी करू, असेही पवार म्हणाले.

एकाही आश्‍वासनाची पूर्तता नाही
केंद्र सरकारने ‘परदेशातील काळा पैसा आणू’, ‘अच्छे दिन आणू’, ‘दरवर्षी दोन कोटी जणांना रोजगार देऊ’, अशी आश्‍वासने दिली होती. राज्य सरकारनेही ‘१०० दिवसांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न सोडवू’, ‘आचारसंहितेपूर्वी शास्तीकराचा प्रश्‍न सोडवू’, अशी आश्‍वसने दिली होती. यापैकी एकतरी आश्‍वासन पूर्ण केले आहे काय? भाजपची निवडणुकीतील भाषणे वेगळी असतात, उलट नोटाबंदीमुळे ५० लाख जणांचा रोजगार गेल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे,’’ अशी टीकाही पवार यांनी केली.

मी बाहेरचा कसा?
‘नको बारामती, नको भानामती’ या भाजपच्या जाहिरातीवर बोलताना पवार म्हणाले, ‘‘१९९२ पासून मी या शहराच्या संपर्कात आलो. बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहर येत होते. या शहराने मला ३५ हजारांचा लीड दिल्यानंतर शहराशी ऋणानुबंध जोडले गेले, असे असताना मी बाहेरचा कसा, असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला.

पानसरेंवर अन्याय नाही
आझम पानसरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘‘पानसरे यांना पक्षाने नगरसेवक केले, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद दिले. महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक केले. लोकसभा व विधानसभेलाही संधी दिली; मात्र दुर्दैवाने पुन्हा त्यांना अपयश आले. त्यानंतरही त्यांना राष्ट्रवादीने लाल दिवा दिला. यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर अन्याय केलेला नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना संधी दिली असती तर पुन्हा त्यांना अपयश येण्याची शक्‍यता होती, असे संकेत मिळाले होते. त्यामुळेच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली होती. राष्ट्रवादीने त्यांना एवढे सर्व देऊनही त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला, हे आम्हाला कळाले नाही.’’

Web Title: gund party is the BJP image